ज्येष्ठ नागरिकांना मालमत्ता करात ३० टक्के सवलत असल्याचा समाजमाध्यमांवर प्रसारित होणारा संदेश बनावट
मुंबई, दि. १७
हा संदेश वाचून ज्येष्ठ नागरिकांनी विभाग कार्यालयात येणे टाळावे, महानगरपालिका प्रशासनाकडून आवाहन*
महाराष्ट्र सरकार गृहनिर्माण धोरण-२०२५ अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या निवासी मालमत्तेसाठी करात ३० टक्के सवलत दिली जात असल्याबाबतचा संदेश विविध समाजमाध्यमांवरुन (सोशल मीडिया) प्रसारित होत आहे. तसेच, हा संदेश वाचून ज्येष्ठ नागरिक मोठ्या प्रमाणात प्रशासकीय विभाग कार्यालयांमध्ये (वॉर्ड) येऊन चौकशी करत असल्याचे निदर्शनास येत आहे.
या अनुषंगाने, बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात येत आहे की, ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या निवासी मालमत्तेसाठी करात ३० टक्के सवलत देण्यासंदर्भात बृहन्मुंबई महानगरपालिका अधिनियम १८८८ मध्ये कोणतीही तरतूद नाही. त्यामुळे, नागरिकांनी यासंदर्भात प्रशासकीय विभाग कार्यालयात (वॉर्ड) येणे टाळावे. जेणेकरुन, त्यांना नाहक त्रास सहन करावा लागणार नाही.
महानगरपालिका प्रशासनाकडून हेदेखील कळवण्यात येत आहे की, बृहन्मुंबई महानगरपालिका धोरणानुसार, दिनांक १ जानेवारी २०२२ पासून ५०० चौरस फुटापेक्षा कमी क्षेत्रफळाच्या निवासी मालमत्तांना करसवलत दिली जाते. तसेच, माजी सैनिक, त्यांच्या विधवा आणि अविवाहित शहीद सैनिकांच्या कुटुंबियांनाही त्यांच्या एका मालमत्तेच्या करात (शासनाचे कर वगळून) सवलत देण्यात येते.KK/ML/MS