Blinkit ने मागे घेतला १० मिनिटांत डिलिव्हरी’चा दावा
मागील काही वर्षांमध्ये जिथं ऑनलाईन अॅपचा वापर फक्त लहानमोठ्या गोष्टी किंवा खाण्याचे पदार्थ मागवण्यासाठीच केला जात होता, तिथंच आता या आणि अशा अनेक अॅपच्या माध्यमातून सणावारासाठी लागणाऱ्या सजावट सामग्री, रोषणाईपासून ते अगदी शालेय अभ्यासासाठी लागणारी पट्टी- पेन्सिलसुद्धा दहाव्या मिनिटाला थेट घरपोच मिळत आहे. ब्लिंकीट, झेप्टो, इन्स्टामार्ट, झोमॅटो या आणि अशा कित्येत अॅपच्या माध्यमातून ही सुविधा मिळत असून ग्राहकही त्याचा उपभोग घेताना दिसत आहेत. (Blinkit, Zepto, Swiggy, Zomato) मात्र आता याच अॅपकडून दिली जाणारी एक लोकप्रिय सुविधा बंद केली जाणार आहे.
मागील काही काळापासून डिलीव्हरी पार्टनर अर्थात गिग वर्कर्स युनियनकडून मोठ्या प्रमाणात विरोधी निदर्शनं आणि संप पुकारण्यात आला होता. जिथं 10 ते 20 मिनिटांच्या आत डिलीव्हरीची वेळ सांगणं असुरक्षित असून, त्यामुळं डिलीव्हरी पार्टनरना वेगानं दुचाकी चालवावी लागते. ज्यामुळं अपघाताचा धोका वाढतो या मुद्द्याकडे केंद्राचं लक्ष वेधलं होतं. सरकारनं या मुद्द्यांचा गांभीर्यानं विचार करत कंपन्यांशी चर्चा करत वरील निर्णय घेतला. ज्यामुळं डिलीव्हरी पार्टनरना मोठा दिलासा मिळाली आहे. क्लिक कॉमर्स इंडस्ट्रीत घेण्यात आलेला हा एक महत्त्वाचा निर्णय असून, आता यामध्ये ग्राहकांसमवेत कर्मचाऱ्यांनाही केंद्रस्थानी ठेवलं जात असल्याची बाब स्पष्ट होत आहे. या नियमामुळं अर्थातच काही वस्तूंच्या डिलीव्हरीची वेळ वाढणार असली तरीही त्याची सकारात्मक बाजू म्हणजे कर्मचाऱ्यांचा जीव यामुळं धोक्यात येणार नाही.
केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्री मनसुख मांडविया यांनी सदर प्रकरणी लक्ष घातल्यानंतर क्विक कॉमर्स कंपनी अशी ओळख असणाऱ्या ब्लिंकीटकडून सर्व स्तरावरून 10 मिनिटांत सामानाची डिलीव्हरी केला जाण्याचा दावा खोडून काढला आहे. हा निर्णय डिलीव्हरी कामगारांची सुरक्षितता आणि उत्तम कार्यपद्धतीला केंद्रस्थानी ठेवत घेण्यात आला आहे.
मांडविया यांच्या माहितीनुसार ब्लिंकीट, झेप्टो, स्विगी आणि झोमॅटोच्या अधिकाऱ्यांसमवेत झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय झाला. ज्यामध्ये मांडविया यांनी सक्तीच्या डिलीव्हरी वेळमर्यादेला हटवलं जाण्याच्या सूचना केल्या ज्यामुळं डिलीव्हरी पार्टनर म्हणून काम करणाऱ्यांच्या जीवाला घाईघाईतील प्रवासामुळं धोका राहणार नसून त्यांना सुरक्षितरित्या काम करता येईल. सदर बैठकीमध्ये सर्व कंपन्यांनी केंद्राला आपण ब्रँडच्या जाहिराती, सोशल मीडिया आणि इतर माध्यनांतून डिलीव्हरीच्या वेळेसंदर्भातील सर्व दावे हटवू अशी हमी दिली. ब्लिंकीटकडून तातडीनं याबाबतचा निर्णय लागू केला तर, उर्वरित कंपन्या येत्या काळात हा नियम लागू करण्याची तयारीसुद्धा दाखवत आहेत.
SL/ML/SL