अंध विद्यार्थिनीची अनोखी रामभक्ती – राम गीत गाऊन केली आराधना

ठाणे, दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :जन्मतः अंध असली तरी प्रभू श्रीरामा प्रती तिची भक्ती मात्र डोळस आहे. ठाण्यातील ११ वर्षीय श्रेया शिंपी ही जन्मतः अंध असुन तिला अयोध्येतील प्रभू श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठापनेला जाण्याचा योग आला नसला तरी आपली भक्ती व्यक्त करण्यासाठी तिने चक्क राम नामाचे गाणे गाऊन रसिक भाविकांचे लक्ष वेधले आहे.
ठाण्यातील पाचपाखाडी टेकडी बंगला येथील अष्टविनायक दर्शन सोसायटीत राहणारी श्रेया शिंपी ही राहूल आणि स्वाती शिंपी या दांपत्याची एकुलती एक मुलगी आहे.
२०१२ साली जन्मलेली श्रेया जन्मतः अंध असून इयत्ता पाचवीमध्ये शिकत आहे. दोन्ही नेत्रानी दिव्यांग असली तरी श्रेया ही नौपाड्यातील ब्राम्हण विद्यालय या नियमित शाळेत शिकत असून प्रत्येक परिक्षेत शाळेत ती नेहमीच पहिली येते.
श्रेयाचे आजोबा घरच्या घरी हार्मोनियम, बासरी वाजवायचे एवढाच काय तो कलेचा वारसा शिंपी घराण्यात होता. पण
अनुवांशिकता म्हणा अथवा अन्य काही चमत्कार … श्रेया बालपणा पासूनच संगीत आणि गायन कलेत पारंगत होत गेली. श्रेयाने आजपर्यत २०० गाणी गायली आहेत.तसेच अनेक गाण्याच्या स्पर्धा आणि कार्यक्रमांमध्ये श्रेयाने आपल्या कलेचे सादरीकरण केल्याचे तिचे आईवडील सांगतात.
अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापनेच्या पार्श्वभूमीवर सध्या देशभरात राम नामाचा जागर होत आहे. या पार्श्वभूमीवर गीतकार प्रविण भालेराव यांनी रचलेल्या आणि संगीत संयोजक अनिल वैती यांनी स्वरबद्ध केलेल्या श्री रामावरील ” बोलो राम राम राम” या गाण्यासाठी त्यांना सुयोग्य असा आवाज हवा होता. त्यासाठी अनेकांच्या चाचण्या केल्या होत्या मात्र चिमुकल्या श्रेयाच्या आवाजाची त्यांना भुरळ पडली. आणि पहिल्याच प्रयत्नात श्रेयाने हे गाणे गाऊन एक वेगळा अविष्कार दाखवला आहे.
श्रेया नेत्रहीन असली तरी श्रेया स्वावलंबी आहे. ती अभ्यासा सोबतच आपली सर्व कामे स्वतःच करते.तिला प्रभू श्रीरामा साठी गाणे गाण्याची इच्छा होती. तिची ही इच्छा पूर्ण झाली. “बोलो राम राम राम” हे गीत अयोध्येतील प्रभू श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अर्पण केल्याचे श्रेया सांगते. Blind student’s unique devotion to Ram – worshiped by singing Ram Geet
ML/KA/PGB
18 Jan 2024