बाहेरून आलेल्यांना वापरा आणि फेका हीच भाजपाची नीती

मुंबई, दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राज्यात राबविण्यात येणाऱ्या कोट्यावधी रुपयांच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांना अंतिम मंजुरी देण्याचा अधिकार असलेल्या मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीतून महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना वगळण्यात आल्याने बाहेरून आलेल्यांना वापरा आणि फेका अशी भाजपाची निती असल्याची टीका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे, ते आज पत्रकार परिषदेत बोलत होते.
विरोधी पक्षनेते वडेट्टीवार म्हणाले की, राज्यात राबविण्यात येणाऱ्या कोट्यवधी रुपयांच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांना अंतिम मंजुरी देण्याचे अधिकार मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीला आहेत. अजित पवार गटामुळे या मंत्रिमंडळाच्या पायाभूत सुविधा समितीतून विखे पाटलांची गच्छंती झाली असून राष्ट्रवादीच्या सत्तेतील सहभागामुळे ट्रिपल इंजीन सरकारमध्ये धुसफूस सुरू आहे.
कोल्हापूरच्या दादांना पुण्याचा साखर कारखाना हवा होता पण पुण्याचे दादा सत्तेत आल्यानंतर त्यांची कोल्हापूरच्या दादांची जिरवली आणि आधी जो निर्णय होता अक्रियाशील सदस्य मतदान करू शकणार नाही , निवडणूक लढू शकणार नाही..तो निर्णय बदलला…
यासोबतच भाजप नेत्यांच्या साखर कारखान्याला कर्ज घेण्यासाठी जाचक अटी घातल्या होत्या. पुण्याचे दादा असलेल्या अजित पवार यांच्या या निर्णयाला नागपूरच्या देवेंद्र फडणवीस यांनी स्थगिती दिली.
यावरून दादांवर नागपूरचे भाऊ वरचढ ठरत असल्याचा टोला विरोधी पक्ष नेत्यांनी मारला. ट्रिपल इंजिन सरकारमधील इंजिन एकमेकांना धक्का देत आहेत त्यामुळे ही गाडी रुळावरून घसरेल अशी टीका विरोधी पक्ष नेत्यांनी केली.
महायुती सरकारवर निशाणा साधताना वडेट्टीवार पुढे म्हणाले,नीती आयोगाच्या माध्यमातून दिल्लीवरून मुंबईवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न होत आहे. तसेच सरकार दुष्काळ जाहीर करत नाही तोपर्यंत आम्ही हा मुद्दा लावून धरू आणि सरकारला दुष्काळ जाहीर करण्यासाठी सरकारला भाग पाडू.
वडेट्टीवार पुढे म्हणाले की,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादीवर ७०हजार कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप केला आणि नंतर त्याच राष्ट्रवादीला सत्तेत सामावून घेतले, यावरून सत्तेचा धाक दाखवण्याचे काम सुरू असून भाजपाने कमळ चिन्ह बदलून वॉशिंग मशीन चिन्ह घ्यायला पाहिजे असा टोलाही विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांनी लगावला. BJP’s policy is to use and throw away those who come from outside
ML/KA/PGB
30 Aug 2023