निवडणूकी आधीच भाजपचा लोकसभा विजय, सुरतमधील उमेदवार बिनविरोध

 निवडणूकी आधीच भाजपचा लोकसभा विजय, सुरतमधील उमेदवार बिनविरोध

सुरत, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : लोकसभा निवडणुकीचा सर्वच पक्षांकडून जोरदार प्रचार सुरु आहे. यामध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांच्या उत्साहाला बळ देणारी घटना घडली आहे. लोकसभा निवडणुकीआधीच भाजपने पहिला विजय नोंदवला आहे. सुरतमधील भाजपचे उमेदवार मुकेश दलाल यांची बिनविरोध निवड झाली आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी आठही उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. यानंतर भाजपचे उमेदवार मुकेश दलाल यांचा बिनविरोध विजय झाला. दलाल हे सुरतच्या इतिहासात बिनविरोध निवडून आलेले पहिले खासदार ठरले आहेत. आता निवडणूक आयोगाकडून याची अधिकृत घोषणा होणे बाकी आहे.

सुरतमध्ये आधी काँग्रेसचे उमेदवार नीलेश कुंभानी यांचा अर्ज रद्द झाल्याने समीकरणे बदलली होती. बसपाचे उमेदवार प्यारे लाल भारती यांनी अर्ज मागे घेतला. मुकेश दलाल हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष सीआर पाटील यांचे निकटवर्तीय आणि विश्वासू मानले जातात. आता गुजरातमध्ये 25 जागांसाठी 7 मे रोजी मतदान होणार आहे. काँग्रेसचे उमेदवार नीलेश कुंभानी यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे, मात्र अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. अशा स्थितीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत पूर्ण झाल्यानंतर मुकेश दलाल विजयी झाले आहेत.

सुरत लोकसभा मतदारसंघातून बिनविरोध निवडून आलेले मुकेश दलाल हे सुरत भाजपचे सरचिटणीस आहेत. मोझ व्यापारी समाजातील मुकेश दलाल हे भाजप प्रदेशाध्यक्ष सीआर पाटील यांचे विश्वासू मानले जातात. ते सध्या SDCA समितीचे सदस्य आहेत. ते सुरत महानगरपालिकेचे (SMC) माजी स्थायी समिती अध्यक्ष देखील राहिले आहेत. याआधी दलाल यांनी भाजप युवा मोर्चामध्ये राज्य पातळीवर काम केले होते. दलाल तीन वेळा एसएमसीचे नगरसेवक आणि पाच वेळा स्थायी समितीचे अध्यक्ष होते. दलाल हे सुरत पीपल्स कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेडचे ​​माजी अध्यक्ष आहेत. त्यांनी वाणिज्य शाखेत पदवी घेतली असून एलएलबी, एमबीए फायनान्सचे शिक्षण घेतले आहे. दलाल हे 1981 पासून भाजपशी संबंधित होते. दर्शना जरदोश या सध्या सुरतच्या खासदार आहेत. यावेळी पक्षाने मुकेश दलाल यांना उमेदवारी दिली आहे.

SL/ML/SL

22 April 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *