भाजप बिहारमध्ये उभारणार सीता मंदीर

पटना, दि. २१ : बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने एक महत्त्वाची घोषणा केली आहे – बिहारच्या सीतामढी जिल्ह्यात माता सीता यांचे भव्य मंदिर उभारले जाणार आहे. हे मंदिर पुनौरा धाम येथे बांधले जाईल, जे माता सीतेचे जन्मस्थान मानले जाते. मंदिराचा भूमिपूजन सोहळा 8 ऑगस्ट 2025 रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. त्यांनी ‘शाश्वत मिथिला महोत्सव 2025’ च्या कार्यक्रमात या मंदिराच्या प्रकल्पाची औपचारिक घोषणा केली.
मंदिराचा परिसर अयोध्येतील राम मंदिराच्या धर्तीवर भव्य आणि सुव्यवस्थित असणार आहे. एकूण 56 एकर क्षेत्रफळात मंदिर उभारले जाणार असून यात 251 फूट उंचीची सीता माता मूर्ती हे एक प्रमुख आकर्षण असेल. याशिवाय परिसरात सीता कुंड, सीता वाटिका, लव-कुश वाटिका, ध्यानगृह, परिक्रमा मार्ग, प्रवाशांसाठी पार्किंग व्यवस्था आणि अनेक सांस्कृतिक-सुविधा असतील. या प्रकल्पाचा उद्देश केवळ धार्मिक नव्हे, तर पर्यटकांना आकर्षित करण्याचा आणि मिथिलांचल परिसराला धार्मिक पर्यटनाच्या नकाशावर अधिक ठळकपणे अधोरेखित करण्याचा आहे.
राजकीय दृष्टिकोनातून पाहता, भाजपकडून हा मंदिर प्रकल्प बिहार विधानसभा निवडणुकीसंदर्भात एक रणनीतिक निर्णय मानला जात आहे. मिथिलांचल भागातील जवळपास 60 विधानसभा जागांपैकी 40 जागांवर एनडीएचा प्रभाव असल्याचे सांगितले जाते, त्यामुळे या मंदिराच्या घोषणेमुळे भाजप स्थानिक जनतेशी अधिक घट्ट संबंध निर्माण करू पाहत आहे. सीता मंदिर हे धार्मिक श्रद्धा आणि राजकीय हित साधण्याचे एक महत्त्वाचे साधन ठरू शकते, असा अंदाज राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत.
हे मंदिर केवळ बिहारसाठी नव्हे, तर संपूर्ण भारतातील रामायणप्रेमी आणि धार्मिक भावनांना जोडणारे एक पवित्र स्थान बनू शकते. सीतेच्या नावाने उभारले जाणारे हे भव्य मंदिर भक्तांच्या निष्ठा आणि श्रद्धेला नवा दिशा देईल, असं अनेक धार्मिक आणि सांस्कृतिक मंडळींचं म्हणणं आहे.