भाजपा – मनसेचे तुझ्या गळा, माझ्या गळा सुरू
मुंबई, दि. ३० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बिनशर्त पाठींबा दिलेल्या राज ठाकरे यांनी विधानसभेत मात्र, स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेत १३८ उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. मात्र, असे असले तरी राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांना माहीम मतदारसंघात पाठिंबा द्यावा, अशी भूमिका भाजपानं आणि शिवसेनेच्या काही नेत्यांनीही घेतली आहे तर यंदा मुख्यमंत्री भाजपचे देवेंद्र फडणवीसच होतील तेही आमच्या पाठिंब्याने अशी भूमिका आज राज ठाकरे यांनी मांडली आहे.महायुतीने बाळा नांदगावकर उमेदवार असलेल्या शिवडीच्या जागेवरही उमेदवार दिलेला नाही.
एकीकडे महायुतीकडून मनसेला सहकार्याचं धोरण दिसत असतानाच मनसे प्रमुख राज ठाकरे यांनीही एका खासगी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मनसेच्या सहकार्यानं पुढचा मुख्यमंत्री भाजपाचा होईल, असे भाकित केले आहे. राज्यात महायुतीची सत्ता येईल असे सांगत त्यांनी महायुती – मनसे यांच्यातला हा छुपा दोस्ताना निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात वेगळी समीकरणं घेऊन येणारा ठरेल असेच जणू सुचविले आहे .यामुळे मनसेला पहिल्यांदाच सत्तेत सहभागी होण्याची संधी मिळेल का याचे उत्तर तेवीस नोव्हेंबरला मिळेल.राज ठाकरे यांच्या वक्तव्यानंतर भाजपानेही मनसेला दिलासा देणारे वक्तव्य केले. माहीम मतदार संघातले मनसेचे उमेदवार अमित ठाकरे यांना भाजपाचा पाठींबा असल्याची भूमिका भाजपा नेते आणि उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यांशी बोलताना मांडली. माहीम मध्ये उमेदवार उभा न करण्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेही मत होते असेही फडणवीस यांनी सांगितले यामुळे भाजपा आणि मनसे यांच्यात तुझ्या गळा माझ्या गळा सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे.
ML/ ML/ SL
30 October,2024