फडणवीसांच्या निवडीसाठी भाजपाने केले सोशल इंजिनियरिंग
मुंबई, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल लागून तब्बल दहा दिवस उलटल्यानंतर अखेर अकराव्या दिवशी आज भाजपाच्या विधिमंडळ पक्षाची बैठक होऊन त्यात अपेक्षेनुसार देवेंद्र फडणवीस यांची विधिमंडळ पक्षाच्या गटनेतेपदी निवड करण्यात आली. मात्र ही निवड करताना भाजपाने सोशल इंजीनियरिंग चा प्रयोग केल्याचे स्पष्टपणे दिसून आले आहे .
केंद्रीय निरीक्षक विजय रूपानी आणि केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांच्या उपस्थितीत आज भाजपा विधिमंडळ पक्षाची बैठक झाली. विधान भवनातल्या सेंट्रल हॉलमध्ये झालेल्या या बैठकीत पक्षाचे वरिष्ठ नेते चंद्रकांत पाटील आणि सुधीर मुनगंटीवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा प्रस्ताव सदस्यांसमोर ठेवला. त्याला अपेक्षेनुसार आधी पंकजा मुंडे मग प्रवीण दरेकर, रवींद्र चव्हाण, आशिष शेलार, संजय सावकारे, संजय कुटे ,अशोक उईके ,गोपीचंद पडळकर अशा विविध जातीतील आमदारांनी फडणवीस यांच्या नावाला अनुमोदन दिले यातूनच भाजपाने सोशल इंजिनिअरिंग करण्याचा प्रयत्न केल्याचे स्पष्टपणे दिसून आले आहे .
फडणवीस यांच्या नावाचा प्रस्ताव मांडताना सर्व सूचक आणि अनुमोदक यांनी फडणवीस यांचा आमचे नेते असाच उल्लेख केला आणि राज्याला पुढे घेऊन जाण्यासाठी आवश्यक असणारे नेतृत्व असे त्याचे वर्णन केले यात मुनगंटीवार, पंकजा मुंडे, संजय कुटे आदी ओबीसी नेते चंद्रकांत पाटील, आशिष शेलार, रवींद्र चव्हाण,प्रवीण दरेकर हे मराठा नेते तर संजय सावकारे हा दलित चेहरा, अशोक उईकें हा आदिवासी चेहरा, गोपीचंद पडळकर हा धनगर समाजाचा चेहरा असे विविध चेहरे भाजपाने आज गटनेता निवडीसाठी समोर आणले होते.
विधिमंडळ पक्षाची बैठक सुरू होताच विजय रूपानी यांनी निरीक्षक म्हणून विधिमंडळ सदस्यांना आपापली नावे सुचवण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर सर्वप्रथम चंद्रकांत पाटील आणि पाठोपाठ सुधीर मुनगंटीवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. त्याला लगेचच पंकजा मुंडे आणि प्रवीण दरेकर यांनी अनुमोदन दिले. फडणवीस यांची निवड झाल्याचे रूपानी यांनी जाहीर केले आणि मग फडणवीस यांना व्यासपीठावर बोलवून दोन्ही निरीक्षकांनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला. याआधी आज सकाळी भाजपाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांचे नाव विधिमंडळ गटाच्या नेतेपदी निश्चित करण्यात आले होते. या निवडीनंतर लगेचच राज्याच्या मुख्य सचिवांनी फडणवीस यांच्या मुख्यमंत्री पदाच्या शपथविधीची निमंत्रण पत्रिका ही जारी केली.
ML/ML/SL
4 Dec. 2024