भाजपाचे धक्कातंत्र , विधान परिषदेसाठी पुन्हा जुने बाजूला सारले….

मुंबई, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्र विधान परिषदेच्या पाच जागांसाठी येत्या 27 मार्च रोजी पोटनिवडणूक होत असून त्यासाठी भाजपाने आपले तीन उमेदवार जाहीर केले आहेत. त्यात पुन्हा एकदा पक्षाच्या जुन्या जाणत्या नेत्यांना डावलण्यात आले असून काही नवी चेहरे तर एका विधानसभेत निवडून आलेल्या नेत्याला पुन्हा संधी देण्यात आली आहे.
विधान परिषदेतून पाच सदस्य विधानसभेवर निवडून गेल्यामुळे या पाच जागा रिक्त झाल्या होत्या त्यासाठीचा निवडणूक कार्यक्रम देशाच्या निवडणूक आयोगाने जाहीर केला असून 27 मार्च रोजी या पाच जागांसाठी निवडणूक घेण्यात येणार आहे. त्यासाठी 17 मार्च रोजी अर्ज दाखल करायला सुरुवात होणार आहे. भाजपाने आपल्या वाट्याला यायच्या तीन जागांसाठी आपले उमेदवार आज जाहीर केले. यात भाजपाचे वरिष्ठ नेते माधव भंडारी आणि भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांच्यासारखे जुने कार्यकर्ते पुन्हा एकदा डावलण्यात आले आहेत.
भाजपाने जाहीर केलेल्या उमेदवारांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय समजले जाणारे नागपूर येथील संदीप जोशी यांचा समावेश आहे तर छत्रपती संभाजी नगर मधून संजय केनेकर यांना संधी देण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक असणारे सुमित वानखेडे यांना विधानसभेसाठी संधी मिळण्यासाठी वर्धा जिल्ह्यातील आर्वी मतदार संघातील तत्कालीन विद्यमान आमदार दादाराव केचे यांना डावलण्यात आले होते. त्याच केचे यांना आता पुन्हा विधान परिषदेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
पाच जागांसाठी निवडणूक होत असली तरी भाजपाच्या वाट्याला तीन जागा आणि उर्वरित दोन पैकी प्रत्येकी एक जागा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार आणि शिवसेना शिंदे गटासाठी सोडण्यात आली आहे. या दोन जागा मात्र अद्याप जाहीर व्हायचे बाकी असून या दोन्ही जागांसाठी या दोन्ही पक्षांमध्ये प्रचंड चढाओढ आहे. आज रात्री उशिरा किंवा उद्यापर्यंत हे दोन्ही उमेदवार जाहीर होण्याची शक्यता आहे.
शिंदे गटातून चंद्रकांत रघुवंशी, शितल म्हात्रे यांच्यासह अनेक पदाधिकारी आस लावून बसले असून त्यांच्यातून नेमके कोणाला निवडावे हा एकनाथ शिंदे यांच्यासमोर यक्षप्रश्न बनला आहे. तर अजित पवार यांच्या गटाकडून देखील आनंद परांजपे, झिशान सिद्दिकी यांच्यासह असंख्य नावांची चर्चा सुरू आहे. या नावांमधूनच एक नाव अजित पवार यांना निश्चित करायचे आहे त्यामुळे या दोन्ही नावांबद्दल निर्णय घेण्याला पक्षाकडून वेळ लागत असल्याचे दिसून येत आहे. विधानसभेतील संख्याबळ पाहता महायुतीच्या पाचही उमेदवारांचा विजय निश्चित असून काँग्रेस, शिवसेना उबाठा आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्ष यांना कोणतीही संधी मिळणार नसल्याचे स्पष्ट आहे.
ML/ML/PGB
16 March 2025