बिस्क्विकवाले गुलाबजामुन फ्रॉम अमेरिका
मुंबई, दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :रवा, बिस्क्विक आणि खवा/मिल्क पावडर यांचं प्रमाण या मंत्रात सांगितलेलं आहे. तर समजा १ टेबलस्पून रवा कोमट हेवी क्रीम किंवा हाफ अॅन्ड हाफमध्ये साधारण पाऊण तास भिजत ठेवा. ही झाली पूर्वतयारी. आता एका शेगडीवर अगदी मंद आचेवर तेल/तूप तापायला ठेवा. इतकी मंद आच की आपण तापतोय हे तेला/तुपाला कळता कामा नये.
दुसर्या शेगडीवर कप साखर तितक्याच पाण्यात मध्यम आचेवर विरघळत ठेवा. उकळी आल्यावर दोनतीन मिनिटांनी पाकाखालची आच बंद करा. आपल्याला कच्चा पाकच करायचा आहे, ताराबिरा काढायच्या नाहीयेत. पाकात वेलचीपूड आणि/किंवा केशराच्या काड्या आणि/किंवा चमचा-दीड चमचा गुलाबपाणी घाला.
एकीकडे परातीत २ टेबलस्पून बिस्क्विक आणि ६ टेबलस्पून खवा/मिल्क पावडर हाताने मिसळून घ्या. त्यात तो भिजवलेला रवा घाला. हेवी क्रीम/ हाफ अॅन्ड हाफ थोडं थोडं घालत हे मिश्रण चांगलं मऊ कणकेसारखं होईतो मळून घ्या. हाताला किंचित तूप लावून त्या मिश्रणाचे पुजेच्या सुपारीएवढे गोळे करून घ्या.
आता एक छोटी गोळी त्या तेला/तुपात टाकून बघा. ती जर टाकताक्षणी उसळून वर आली तर याचा अर्थ तेल/तूप जरूरीपेक्षा जास्त तापलं आहे. तेल/तूप आचेवरून उतरवा. त्यात ते गोळे लालगुलाबी तळून घ्या.
एखादी बॅच झाली की लागलं तर तेल/तूप परत मंद आचेवर चढवा. स्किल काय ते हे तेल/तूप नेमक्या तापमानाचं वापरण्यात आहे, बाकी आपली रेसिपी फूलप्रूफ आहे! तळलेल्या गोळ्यांना सुई किंवा सेफ्टीपिनेने चहूबाजूंनी टोचे द्या. म्हणजे सुई स्वच्छ बाहेर आली की गोळे नीट तळले गेल्याबद्दल तुमची खात्री पटेल, आणि पाकाला आत शिरायला वाव मिळेल.
गोळे तळल्यावर दीडपट आणि पाकात मुरल्यावर निदान दुप्पट फुगतात. या वर दिलेल्या टेबलस्पूनच्या (१-२-६!) प्रमाणात मध्यम आकाराचे १२ ते १४ गुलाबजाम होतील.
दुसर्या दिवशी गुलाबजाम पाक पिऊन बसतील Bisquickwale Gulab Jamun from America
PGB/ML/PGB
7 Oct 2024