BIS कडून नवा भूकंप जोखीम नकाशा जारी
नवी दिल्ली, दि. २२ : भारत सरकारच्या ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) ने जानेवारी 2025 पासून लागू झालेला नवा ‘सीस्मिक झोनेशन मॅप’ (IS 1893 Part 1:2025) जारी केला आहे. हा नकाशा देशातील भूकंप जोखमीचे वर्गीकरण करतो आणि नवीन इमारती, ब्रिज, हायवे व मोठ्या प्रकल्पांना भूकंपापासून सुरक्षित ठेवण्याचा उद्देश आहे. जुना नकाशा 2002 चा होता, जो 2016 मध्ये थोडा अपडेट झाला होता, परंतु आता नव्या नकाशात प्रोबेबिलिस्टिक सीस्मिक हेजर्ड असेसमेंट (PSHA) पद्धती वापरली आहे.
नव्या नकाशात झोन I रद्द करून झोन II मध्ये सामावला आहे. देशात आता चार झोन आहेत, परंतु सर्वात जास्त धोका असलेला झोन V अधिक ताकदीने परिभाषित करून झोन VI (अल्ट्रा-हाय रिस्क) मानला जात आहे. त्यामुळे देशाचा 61% भाग मध्यमहून अधिक धोक्याच्या झोन III ते VI मध्ये आला आहे (पूर्वी 59%), तर 75% लोकसंख्या सर्वाधिक धोक्याच्या भागात राहते.
सर्वात मोठा बदल हिमालयन आर्कमध्ये झाला आहे. आधी काही भाग झोन IV तर काही झोन V मध्ये होता, परंतु आता कश्मीर ते अरुणाचलपर्यंत संपूर्ण हिमालय झोन VI मध्ये टाकण्यात आला आहे. कारण इंडियन व युरेशियन प्लेट्स अनेक ठिकाणी 200 वर्षांपासून लॉक झाल्या असून, भविष्यात 8 वा त्याहून अधिक तीव्रतेचा भूकंप येऊ शकतो. त्यामुळे हिमालय व आजूबाजूचे प्रदेश (उदा. देहराडून, हरिद्वार) अधिक सतर्क राहतील.
दक्षिण भारतात फारसा बदल नाही. पेनिनसुलर इंडिया स्थिर असल्याने तामिळनाडु, कर्नाटक, आंध्र प्रदेश व केरळचा बहूतांश भाग झोन II वा III मध्ये आहे. मात्र काही किनारी भागात लिक्विफॅक्शनचा धोका नोंदवला गेला आहे.
हा नकाशा BIS ने 10 वर्षांच्या संशोधनानंतर तयार केला असून वाडिया इन्स्टीट्यूट, NCS व आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांचा सहभाग होता. यात GPS डेटा, सॅटेलाइट इमेजरी, एक्टिव फॉल्ट्स व लाखो सिम्युलेशनचा वापर केला आहे.
तज्ज्ञांच्या मते भूकंपापासून पूर्ण सुरक्षितता शक्य नाही, परंतु नुकसान 80-90% पर्यंत कमी होऊ शकते. नवीन नियमांमुळे इमारती कोसळणार नाहीत, 61% भागात भक्कम डिझाईन होईल आणि 75% लोकसंख्येला फायदा मिळेल. NDMA च्या अहवालानुसार जुन्या इमारतींना अपडेट केल्यास भविष्यात मृत्यूदर मोठ्या प्रमाणात कमी होईल.