पक्षी सप्ताहातच तब्बल २२५ दुर्मिळ पक्ष्यांची कत्तल!

 पक्षी सप्ताहातच तब्बल २२५ दुर्मिळ पक्ष्यांची कत्तल!

चंद्रपूर दि ९ :- वन्यजीव संरक्षणाच्या जनजागृतीसाठी सुरू असलेल्या पक्षी सप्ताहातच दुर्मीळ पक्ष्यांची अमानुष शिकार केल्याचा धक्कादायक प्रकार सावली वनपरिक्षेत्रात उघडकीस आला आहे. व्याहाड उपवनक्षेत्रातील मौजा उमरी लगतच्या तलावात रेशाळ कंठाची भिंगरी (Streak-throated Swallow) या संरक्षित प्रजातीच्या पक्ष्यांची शिकार करणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यातील चार शिकाऱ्यांना सावली वनविभागाने मुद्देमालासह रंगेहात अटक केली आहे.

लोमेश गेडाम (३४), प्रताप जराते (४५), अरविंद गेडाम (३३), मुखरू मेश्राम (६५) सर्व रा. पारडी, ता. जि. गडचिरोली असे अटकेतील आरोपींचे नाव आहेत.
पद्मश्री स्व. मारोती चितमपल्ली आणि पक्षीतज्ञ डॉ. सलीम अली यांच्या जयंतीनिमित्त देशभर ५ ते १२ नोव्हेंबरपर्यंत पक्षी सप्ताह साजरा केला जातो. अशातच शिकाऱ्यांनी दुर्मिळ पक्षाची बेकायदा कत्तल केल्याने वनविभागात संतापाचे वातावरण आहे. पहाटेच्या सुमारास उमरी तलाव परिसरात वनकर्मचारी पक्षीनिरीक्षण करीत असताना, संशयास्पद हालचाल दिसल्याने कारवाई करण्यात आली. वनपथकाने घटनास्थळी धडक देताच शिकारींनी पकडलेल्या पक्ष्यांचा मोठा साठा आढळला.

वनविभागाने मुद्देमालांसह चौघांनाही ताब्यात घेऊन वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ च्या कलम ९, ३९, ४९, ५०, ५१ अन्वये गुन्हा नोंदविला आहे. पुढील तपास विभागीय वन अधिकारी राजन तलमले, सहायक वनसंरक्षक विकास तरसे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी विनोद धुर्वे करीत आहेत.वनविभागाने शिकाऱ्यांकडून शिकारीसाठी वापरलेली जाळी ८ नग, थैली ५, नायलॉन दोरीचे ९ बंडल, बांबू काठ्या १६, लाकडी खुंट्या ८, दोन मोटारसायकली आणि २२५ मृत पक्षी असा मोठा मुद्देमाल केला. ही कारवाई वनपरिक्षेत्र अधिकारी विनोद धुर्वे, वनक्षेत्र सहायक अनंत राखुंडे, तसेच स्थानिक पीआरटी चमू व बिट मदतनीस यांच्या संयुक्त पथकाने केली.ML/ML/MS

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *