सिमेंटच्या जंगलात मुक्या जीवांचा तारणहार..पंचवीस वर्षांपासून भगवान कोळी ठरताहेत बर्डमॅन

 सिमेंटच्या जंगलात मुक्या जीवांचा तारणहार..पंचवीस वर्षांपासून भगवान कोळी ठरताहेत बर्डमॅन

मुंबई : मुंबईची सतत धावणारी जीवनशैली आणि वाढत चाललेलं सिमेंटचं जंगल यातच आता उन्हाळ्याच्या तीव्र झळांनी मुंबईकरांच्या जीवाची लाहीलाही होत आहे. पण, या वाढत्या तापमानात आकाशात स्वच्छंद भरारी घेणाऱ्या मुक्या पक्ष्यांचं काय? उन्हाच्या चटक्यांनी आणि निर्जलीकरणाने अनेक पक्षी आकाशातून तडफडून खाली कोसळत आहेत. जागतिक तापमानवाढीच्या या भयानक संकटात दक्षिण मुंबईतील निर्भय बनो आंदोलनाचे अध्यक्ष भगवान कोळी हे या मुक्या जीवांसाठी खऱ्या अर्थाने देवदूत म्हणून धावून आले आहेत.

गेल्या २५ ते ३० वर्षांपासून कोणतीही आर्थिक अपेक्षा न ठेवता, ते खिशातील पैसे खर्च करून या जखमी पशू-पक्ष्यांना नवसंजीवनी देत आहेत. त्यांच्या या नि:स्वार्थ सेवेची आता सोशल मीडियावरही माणुसकीचे मूर्तिमंत उदाहरण म्हणून चर्चा होऊ लागली आहे.

रस्त्यावरील भटके कुत्रे, मांजर असो वा आकाशात उडणारी घार, गिधाड किंवा चिमणी; एखाद्या जखमी प्राण्याची माहिती मिळताच भगवान कोळी सर्व कामे सोडून तात्काळ तिथे पोहोचतात. स्वखर्चाने त्यांच्यावर औषधोपचार करतात आणि ते पूर्णपणे बरे झाल्यावर त्यांना पुन्हा मोकळ्या आकाशात मुक्त करतात.

एक फोन केला, तरी ते मदतीला धावून जातात. नुकतेच उन्हाळ्याच्या तीव्र झळांनी होरपळून जखमी झालेल्या अनेक पक्ष्यांवर त्यांनी यशस्वी उपचार केले. त्यांच्या या प्रामाणिक कार्याची दखल घेत आता वनविभाग आणि इतर काही स्वयंसेवी संस्थाही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या आहेत. मुंबईच्या धावपळीत हरवत चाललेल्या संवेदनशीलतेला त्यांनी आपल्या कार्यातून जिवंत ठेवले आहे.
मी गेली 25 वर्षे मुक्या प्राण्यांसाठी निर्भय बनो आंदोलनाच्या माध्यमातून मुक्या प्राण्यांसाठी काम करत आहे.खिडकीत ठेवा एक वाटी पाणी
वाढत्या उन्हाच्या चटक्यामुळे शहर आणि परिसरातील अनेक प्राण्यांना आणि पक्ष्यांना निर्जलीकरणाचा भयानक त्रास सहन करावा लागत आहे. अनेक मुके जीव पाण्याचा एक थेंब न मिळाल्याने तडफडून प्राण सोडत आहेत. या मुक्या जिवांना वाचवण्यासाठी प्रत्येक मुंबईकराने माणुसकीच्या नात्याने आपल्या खिडकीत, बाल्कनीत, गच्चीवर किंवा अंगणात पाण्याचे एक छोटे भांडे आणि थोडे धान्य आवर्जून ठेवावे. तुमची ही एक छोटीशी कृती एखाद्या मुक्या जिवाचा मौल्यवान प्राण वाचवू शकते, असे अत्यंत भावनिक आवाहन भगवान कोळी यांनी मुंबईकरांना केले आहे.KK/ML/MS

Milind

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *