सौराष्ट्र-कच्छ किनाऱ्यावर बिपरजॉय धडकले, ताशी १२५ किमी वेगाने वारे
अहमदाबाद, दि. १५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आठवडाभराहून अधिक काळ अरबी समुद्रात घोंगावणारे बिपरजॉय चक्रीवादळ आज अखेर हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार गुजरातच्या किनाऱ्यावर धडकण्यास सुरुवात झाली आहे.
बिपरजॉय चक्रीवादळ गुजरातमधील सौराष्ट्र आणि कच्छला धडक देत आहे. चक्रीवादळामुळे ताशी 125 किमी वेगाने वारे वाहत आहेत. वाऱ्याचा वेग ताशी 150 किमी पर्यंत पोहोचण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. जोरदार वाऱ्यामुळे सौराष्ट्र आणि कच्छच्या अनेक भागात झाडे आणि खांब पडायला सुरुवात झाली आहे.मध्यरात्रीपर्यंत लँडफॉल सुरू राहणार असल्याचे आयएमडीचे म्हणणे आहे. चक्रीवादळामुळे निर्माण झालेला धोका लक्षात घेता, एक लाखांहून अधिक लोकांना किनारी भागातून हलवण्यात यश आले आहे.
गुजरातमध्ये 15 जहाजे आणि 7 विमाने तयार ठेवली आहेत. एनडीआरएफच्या 27 तुकड्याही तैनात आहेत, अशी माहिती कमांडर कोस्ट गार्ड क्षेत्र-उत्तर पश्चिमचे महानिरीक्षक एके हरबोला यांनी दिली आहे. जेथे वादळाचा धोका सर्वाधिक आहे, तेथे लष्कर आणि एनडीआरएफचे जवान तैनात आहेत. अनेक भागात समुद्राचे पाणी शिरले आहे. गुजरातमधील अनेक जिल्ह्यांमध्ये आता ऑरेंज अलर्टचे रेड अलर्टमध्ये रूपांतर करण्यात आले आहे. खबरदारी म्हणून सुमारे एक लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. 76 हून अधिक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. लोकांना घराबाहेर न पडण्याचा सल्ला देण्यात आला आहे. राज्य आणि केंद्र सरकार परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. बिपरजॉयमुळे आज द्वारकाधीश मंदिर भाविकांसाठी बंद ठेवण्यात आले आहे.
हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, गुजरात व्यतिरिक्त या वादळाचा प्रभाव इतर 10 राज्यांमध्ये दिसत आहे. यामध्ये राजस्थान, महाराष्ट्र, कर्नाटक, लक्षद्वीप, केरळ, आसाम, अरुणाचल प्रदेश, मेघालय यांचा समावेश आहे. येथील अनेक भागात जोरदार वारे वाहत असून पाऊस पडत आहे.
दक्षिण अरबी समुद्रात वादळाची उत्पत्ती झाल्यानंतर, गुजरात किनारपट्टीजवळ येईपर्यंत त्याचा मार्ग अनेक वेळा बदलला. यामुळे ते कमकुवत झाले आहे, परंतु काही वेळा ते धोकादायक बनले. गुजरातमधील 8 प्रभावित जिल्ह्यांमधून 75 हजारांहून अधिक लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.
वादळाचा परिणाम गुजरात आणि महाराष्ट्रासह कर्नाटक, लक्षद्वीप, केरळ, आसाम, अरुणाचल प्रदेश, मेघालय आणि पश्चिम राजस्थानमध्ये दिसत आहे. येथील अनेक भागात जोरदार वारे वाहत असून पाऊस पडत आहे.
SL/KA/SL
15 June 2023