मुंबईत उभे राहणार ‘बिहार भवन, ३१४ कोटी रु, मंजूर

 मुंबईत उभे राहणार ‘बिहार भवन, ३१४ कोटी रु, मंजूर

मुंबई, दि. १९ : बिहार सरकारने दिल्लीतील ‘बिहार भवन’च्या धर्तीवर आता मुंबईतही ‘बिहार भवन’ उभारण्याचा निर्णय घेतला आहे. प्रशासकीय कामकाज आणि जनकल्याणाला चालना देण्यासाठी ही ३० मजली अत्याधुनिक इमारत उभारली जाणार असून, जागेची निश्चिती आणि बजेट मंजुरी पूर्ण झाली आहे.
बांधकाम विभागाचे सचिव कुमार रवी यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे भवन मुंबई पोर्ट ट्रस्टच्या एल्फिन्स्टन इस्टेट परिसरात उभारले जाणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या प्रकल्पाला ३१४ कोटी २० लाख रुपयांची प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे. या निर्णयामुळे प्रकल्पाच्या अंमलबजावणीला गती मिळणार आहे.

मुंबईत बिहार भवन उभारण्याचा निर्णय हा राज्याच्या प्रगतीसाठी आणि लोककल्याणाच्या दृष्टीने महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. मुंबईतील बिहारच्या रहिवाशांना सुविधा उपलब्ध करून देणे आणि राज्याची प्रशासकीय उपस्थिती मजबूत करणे हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

“या इमारतीत सरकारी कामकाज, बैठका आणि निवासासाठी सुविधा असतील. विशेषतः कर्करोग उपचारासाठी बिहारमधून मुंबईत येणाऱ्या नागरिकांसाठी खास व्यवस्था करण्यात येईल,” असे अधिकृत निवेदनात नमूद करण्यात आले आहे. सुमारे ०.६८ एकर जागेवर उभारण्यात येणाऱ्या या बिहार भवनाची उंची सुमारे ६९ मीटर असेल. बहुमजली इमारतीत एकूण १७८ रूम असतील, तसेच रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांसाठी २४० बेडची क्षमता असलेली डॉरमेटरी असेल. याशिवाय, सेन्सर-आधारित स्मार्ट ट्रिपल किंवा डबल-डेकर पार्किंगची सुविधा असून, एकाच वेळी २३३ वाहनांचे पार्किंग करता येणार आहे. इमारतीत कॉन्फरन्स हॉल (७२ आसनक्षमता), कॅफेटेरिया, वैद्यकीय कक्ष आणि अन्य आवश्यक सुविधा देखील उपलब्ध असणार आहेत.

SL/ML/SL

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *