शिंदे सरकारचा मोठा निर्णय, डीसीपी सौरभ त्रिपाठींचं निलंबन मागे

मुंबई दि.29(एम एमसी न्यूज नेटवर्क) : काळबादेवी येथील अंगडिया व्यापाऱ्यांकडून जबरदस्तीनं खंडणी वसूल केल्याप्रकरणी गेल्या वर्षी ठाकरे सरकारनं निलंबित केलेले पोलीस उपायुक्त सौरभ त्रिपाठी यांचं निलंबन शिंदे सरकारकडून मागे घेण्यात आलं आहे. मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील समितीनं हा निर्णय घेतला आहे. गेल्यावर्षी मार्च महिन्यात त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती.
काळबादेवी येथील अंगडिया व्यापाऱ्यांकडून खंडणी उकळल्याप्रकरणी आयपीएस अधिकारी आणि मुंबईचे पोलीस उपायुक्त सौरभ त्रिपाठी यांच्यावर गेल्या वर्षी गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर त्यांच्या निलंबनासाठी राज्याच्या गृहविभागानं तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडं प्रस्ताव पाठवला होता. या प्रस्तावावर सही करत २२ मार्च २०२२ रोजी त्रिपाठी यांचं निलंबन करण्यात आलं होतं.
यासंदर्भात मुख्य सचिव मनोज सैनिक यांच्या अध्यक्षतेखाली उच्च स्तरीय समितीची स्थापन करण्यात आली होती. या समितीनं त्रिपाठी यांच्यावरील निलंबनाची कारवाई मागे घेतली. आयपीएस अधिकाऱ्याला तीन महिन्यांपेक्षा अधिक काळासाठी निलंबित ठेवता येत नाही, त्यामुळं त्रिपाठींचं निलंबन मागे घेण्यात येत आहे, असं या समितीनं निर्णय घेताना म्हटलं आहे.
SL/KA/SL
29 June 2023