महाविकास आघाडीतला गोंधळ संपता संपेना…

मुंबई, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची उद्याची अंतिम तारीख असताना ही महा विकास आघाडीतला गोंधळ संपायचे नाव घेत नाही, उमेदवार याद्यांमध्ये घोळ घातला असतानाच आता प्रत्येकी नव्वद जागांचा प्रस्ताव ठरलेलाच नाही अशी भूमिका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी घेतली आहे. महायुतीच्या जागांचे वाटप ही अद्याप अंतिम नाही, रात्री उशिरा पर्यंत आणखी काही जागा दोन्ही बाजूने जाहीर करण्यात येतील अशी अपेक्षा आहे.गेल्या आठवड्यात आघाडीने पत्रकार परिषद घेऊन आमच्या प्रत्येकी ८५ जागांवर एकमत झाल्याचे सांगितले आणि एकूण २७० जागा अंतिम झाल्याचेही स्पष्ट केले होते. त्याचवेळी हे अंकगणित चुकल्याची जाणीव माध्यमांनी करून दिल्यावर दुसऱ्या दिवशी बाळासाहेब थोरात यांनी आमच्या प्रत्येकी नव्वद जागांचे ठरल्याचे माध्यमांना सांगितले होते, आज पटोले यांनी थेट नव्वद जागांचा फॉर्म्युला आला कुठून असा सवाल मध्यमांनाच केला , यातून त्यांच्यात किती गोंधळ आहे ते चव्हाट्यावर आले आहे.दुसरीकडे काँग्रेसने आपले दोन उमेदवार बदलले, एक अंधेरी प मधून सचिन सावंत ऐवजी अशोक जाधव तर औरंगाबाद पूर्व मधून लहू शेवाळे यांना मधुकर देशमुख यांच्या जागी उमेदवारी देण्यात आली आहे. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने काटोल मधून अनिल देशमुख यांच्या ऐवजी त्यांचा मुलगा सलील देशमुख यांना उमेदवारी दिली तर शिवसेनाउबाठा पक्षाने चोपडा मतदारसंघात राजू तडवी ऐवजी प्रताप सोनावणे यांना बदलून दिले आहे. यामुळे त्यांच्यात नेमके काय चालले आहे ते समजत नाही.महाविकास आघाडीत असा घोळ सुरूच आहे, सोलापूर दक्षिण आणि दिग्रस मधून काँग्रेस आणि शिवसेना उबाठा या दोनहीं पक्षांनी तर परांडा मधून शिवसेना उबाठा आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने आपले स्वतंत्र उमेदवार दिले आहेत.दुसरीकडे महायुतीत असा गोंधळ नसला तरी त्यांचे ही अजून उमेदवार अंतिम होत नाहीत , भाजपची १४६ जणांची , शिवसेनेची ६५ जणांची तर राष्ट्रवादी काँग्रेस ची ४९ जणांची यादी जाहीर करण्यात आली आहे, यामुळे महायुतीच्या २६० तर महा विकास आघाडीच्या २६६ जागा जाहीर करण्यात आल्या आहेत, दोन्ही बाजूने बंडखोरांची आणि नाराज नेत्यांची रांग लागली असून त्याचा फटका नेमका कोणाला बसतो हे पाहायचे.