पोषण आहाराला वाटण्याच्या अक्षता , चौकशी जाहीर
मुंबई दि १७ : राज्यातील अनुदानित शाळांमध्ये प्रधानमंत्री पोषण आहार योजनेअंतर्गत हिरवा वाटाणा देण्याऐवजी स्वस्तातील साधा वाटाणा घालून पोषण आहार पुरवठा करण्यासंदर्भात आलेल्या तक्रारींची चौकशी एका महिन्यात सचिव स्तरावरून केली जाईल आणि त्यातील अहवालानुसार कारवाई करण्यात येईल अशी घोषणा शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी विधानसभेत केली.
या संदर्भातील लक्षवेधी सूचना कैलास पाटील यांनी मांडली होती. त्यावर रमेश बोरनारे, नितीन राऊत यांनी उपप्रश्न विचारले. पोषण आहार पुरवठा करण्यासाठीच्या निविदेमध्ये हिरवा वाटाणा असे स्पष्ट उल्लेख असूनही प्रत्यक्षात साधा वाटाणा पुरवला जातो. यामुळे किलोमागे शंभर रुपये इतका मोठा भ्रष्टाचार राज्यात झाला आहे असा आरोप सदस्यांनी केला होता. यावर मंत्री भुसे यांनी चौकशी करण्याचे जाहीर केलं होतं ,मात्र विशेष तपास पथकाकडून चौकशी करावी अशी सदस्यांची आक्रमक मागणी होती. अखेर सचिव स्तरावरून ही चौकशी केली जाईल असे मंत्र्यांनी जाहीर केलं. निविदेमध्ये हिरव्या वाटाण्याची नोंद होती मात्र प्रत्यक्षात कार्यादेश देताना केवळ वाटाणा असाच उल्लेख आहे असे मंत्र्यांनी यावेळी सांगितलं.ML/ML/MS