सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीसाठी मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांची रस्त्यांची पाहणी
नाशिक दि. ३० : येणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या तयारीच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम मंत्री मा. शिवेंद्रराजे भोंसले यांनी आज नाशिक आणि त्र्यंबकेश्वर परिसरातील रस्त्यांची पाहणी केली. कुंभमेळ्याच्या काळात अपेक्षित वाढीव वाहतूक आणि भाविकांच्या मोठ्या प्रमाणातील आगमन लक्षात घेऊन पायाभूत सुविधांच्या विकासाला गती देण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) यांच्या माध्यमातून व्यापक नियोजन करण्यात आले आहे.
नाशिक शहर आणि त्र्यंबकेश्वरकडे जाणाऱ्या प्रमुख मार्गांवरील वाहतूक व्यवस्थापन सुलभ व्हावे यासाठी विविध महत्त्वाची कामे हाती घेण्यात आली आहेत. द्वारका परिसरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू आहेत. द्वारका सर्कल आणि शारदा सर्कल मार्गासाठी सर्वेक्षणाचे काम मंजूर करण्यात आले असून, पुणे रोड आणि शारदा सर्कलला जोडणाऱ्या पर्यायी मार्गासाठी एमएसआरडीसीने सर्वेक्षण प्रस्तावाला मान्यता दिली आहे. तसेच, नाशिक-त्र्यंबकेश्वर मार्गावरील दुरुस्ती, रुंदीकरण आणि संरचना विकासाची कामे प्राधान्याने सुरू आहेत.
या पाहणीदरम्यान मंत्री शिवेंद्रराजे भोंसले यांनी संबंधित अधिकाऱ्यांना कुंभमेळ्याच्या काळातील संभाव्य गर्दी लक्षात घेऊन सर्व विकासकामांची गुणवत्ता आणि वेळेत पूर्तता सुनिश्चित करण्याचे निर्देश दिले. “कुंभमेळ्याच्या काळात लाखो भाविक नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे येणार आहेत. त्यामुळे प्रत्येक रस्ते विकास प्रकल्प वेळेत पूर्ण होऊन भाविकांना सुरक्षित, सुलभ आणि सोयीस्कर प्रवासाचा अनुभव मिळावा,” असे मंत्री मंत्री शिवेंद्रराजे भोंसले यांनी यावेळी सांगितले.
सार्वजनिक बांधकाम विभाग आणि एमएसआरडीसीचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित असलेल्या या पाहणीदरम्यान रस्ते विकास आणि वाहतूक व्यवस्थापनाच्या विविध योजनांचा आढावा घेण्यात आला. सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर द्वारका सर्कल आणि शारदा सर्कल परिसरातील रस्त्यांच्या संरचनेचा विकास जलद गतीने सुरू होईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोंसले यांनी दिली.ML/ML/MS