आष्टीच्या डांगर भोपळ्याला ५ राज्यांतून मागणी; ८ महिन्यांत ४५ टन उत्पादन
बीड दि ९ ( रोहिदास हातांगळे ) ….दुष्काळी जिल्हा म्हणून ओळख असलेल्या बीडच्या मातीतून सोन्यासारखं पीक कसं काढायचं, हे आष्टी तालुक्यातील एका दुर्गम भागातील महिला शेतकऱ्याने दाखवून दिले आहे. कानडी खुर्द मेहकरी येथील महिला शेतकरी मंदाकिनी नानासाहेब गव्हाणे यांनी पारंपरिक शेतीला फाटा देत सेंद्रिय डांगर भोपळ्याची यशस्वी लागवड केली आहे. विशेष म्हणजे, त्यांच्या या भोपळ्याचा लळा आता केवळ महाराष्ट्रालाच नाही, तर देशातील ५ राज्यांना लागला आहे.
आजच्या काळात शेती परवडत नाही, अशी ओरड होत असताना मंदाकिनी ताईंनी अत्यंत कमी खर्चात हे गणित बसवले आहे. एकरी फक्त ७ हजार रुपये खर्च करून त्यांनी हे पीक घेतले आहे. त्यांच्या शेतीचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी गेल्या ८ महिन्यांत तब्बल ३ वेळा पीक घेतले असून, दरवेळेस १५ टन याप्रमाणे एकूण ४५ टन उत्पादन मिळवले आहे.
मंदाकिनी ताईंनी रासायनिक खतांना पूर्णपणे फाटा दिला आहे. त्यांनी शेतातील कचरा आणि पालापाचोळ्यापासून स्वतः सेंद्रिय खत तयार केले. फवारणीसाठीही सेंद्रिय पद्धतीचाच वापर केला.
“सेंद्रिय पद्धतीने पिकविल्यामुळे या भोपळ्याचा दर्जा उत्तम राहतो आणि आरोग्यावर कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत, म्हणूनच परराज्यातून मोठी मागणी येत आहे,” असे मंदाकिनी गव्हाणे यांनी अभिमानाने सांगितले.
आष्टीसारख्या दुष्काळी भागातील या रणरागिणीची यशोगाथा आज जिल्ह्यातील इतर शेतकऱ्यांसाठी दीपस्तंभ ठरत आहे. कमी पाणी आणि कमी खर्चात सेंद्रिय शेतीतून लाखो रुपये कसे कमवता येतात, याचे उत्तम उदाहरण मंदाकिनी ताईंनी जगासमोर ठेवले आहे.ML/ML/MS