भिवंडीतून टोरंट पावर हटविण्यासाठी खासदार बाळ्या मामा यांनी घेतली केंद्रीय ऊर्जा मंत्री मनोहर लाल खट्टर यांची भेट

 भिवंडीतून टोरंट पावर हटविण्यासाठी खासदार बाळ्या मामा यांनी घेतली केंद्रीय ऊर्जा मंत्री मनोहर लाल खट्टर यांची भेट

भिवंडी, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भिवंडी शहर व ग्रामीण भागात वीज वितरण व वीज बिल वसूल करणाऱ्या टोरंट पावर कंपनीच्या मनमानी कारभारा विरोधात खासदार बाळ्या मामा यांनी केंद्रीय ऊर्जा मंत्री मनोहर लाल खट्टर यांची मंगळवारी दिल्ली येथे भेट घेत टोरंट पावर हटविण्याची मागणी केली.
भिवंडीतील नागरिक गेल्या १८ वर्षांपासून टोरेंट पॉवर कंपनीच्या मनमानी कारभाराचा त्रास सहन करावा लागत असून १ एप्रिल २०२४ पासून कंपनीने विजेच्या दरात सरासरी ६% वाढ लागू केली आहे.ज्यामुळे सामान्य नागरिकांसोबतच पावरलूम उद्योगावरही प्रचंड आर्थिक भार पडला आहे. १०० युनिटपर्यंत ३० पैसे, १०१-३०० युनिटसाठी ६५ पैसे, ३०१-५०० युनिटसाठी ९४ पैसे आणि ५०० युनिटपेक्षा जास्त वापरासाठी तब्बल १.०७ रुपये प्रति युनिट वाढ करण्यात आली आहे. याशिवाय व्यावसायिक व औद्योगिक दरांमध्ये ३ टक्के आणि ५ टक्के वाढ केल्याने भिवंडीच्या पावरलूम उद्योगाला मोठा फटका बसला आहे.
टोरेंट पॉवर कंपनीकडून ग्राहकांवर वीज चोरीचे खोटे गुन्हे दाखल करून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर आर्थिक वसुली केली जात असून जलद वेगाने फिरणारे मीटर बसवून विजेचे बिल अनावश्यकरित्या वाढवले जात आहेत व ग्राहकांच्या मीटरची योग्य तपासणी न करता त्यांना अव्वाच्या सव्वा बिले पाठवली जात असल्याने भिवंडीकरांमध्ये टोरंट पावर विरोधात प्रचंड संताप पसरला असून टोरंट पावर शहरातून हटविण्यात यावी तसेच पर्यायी वीज वितरण कंपनीची व्यवस्था करावी अशी मागणी खासदार बाळ्या मामा यांनी केंद्रीय ऊर्जामंत्री मनोहर लाल खट्टर यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
केंद्रीय ऊर्जा मंत्री खट्टर यांनी आपल्या मागणीची दाखल घेतली असून लवकरच टोरंट पावर कंपनीच्या मनमानी कारभाराला चाप बसवला जाईल असे आश्वासन खट्टर यांनी आपल्याला दिले असल्याची प्रतिक्रिया भिवंडी लोकसभेचे खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी दिली आहे.

ML/ML/PGB
20 March 2025

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *