महाशिवरात्रीसाठी भीमाशंकर मंदिर राहणार बंद

 महाशिवरात्रीसाठी भीमाशंकर मंदिर राहणार बंद

पुणे, दि. ८ : सन 2027 मध्ये नाशिक येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रयागराज येथे आयोजित महाकुंभ 2025 मधील अनुभवाच्या आधारे नाशिक कुंभमेळा कालावधीत नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे येणाऱ्या लाखो भाविकांपैकी मोठ्या संख्येने भाविक श्री क्षेत्र भीमाशंकर येथे भेट देण्याची शक्यता आहे. साधारणत दररोज सुमारे एक लाख भाविक येथे येण्याची शक्यता लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकर ज्योतिर्लिंग मंदिराच्या सर्वांगीण विकासासाठी श्री क्षेत्र भिमांशकर विकास आराखडा (कुंभमेळा 2027 –गर्दी व्यवस्थापन व इतर सोयी सुविधा) या विशेष विकास आराखड्यास मंजुरी दिलेली आहे.

या विकास आराखड्याअंतर्गत भाविकांसाठी सुरक्षित, सुयोग्य व सुसज्ज सुविधा निर्माण करण्याच्या दृष्टीने विविध पायाभूत कामे हाती घेण्यात आलेली असून त्यामध्ये नवीन भव्य सभामंडप, सुरक्षित प्रवेश-निर्गमन व्यवस्था, पायरी मार्ग तसेच गर्दी व्यवस्थापनासाठी आवश्यक सुविधा विकसित करण्याची कामे सध्या प्रगतिपथावर असून कुंभमेळ्यापूर्वी सर्व आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करणे हे प्रशासनाचे प्रमुख उद्दिष्ट आहे.

कुंभमेळ्याच्या वेळेस श्रीक्षेत्र भिमाशंकर येथे होणाऱ्या गर्दीचे प्रमाण लक्षात घेता जूना सभामंडपाचे क्षेत्र कमी पडणार असल्यामुळे नवीन भव्य सभामंडपाचे काम हाती घेण्यात आलेले असून त्याबरोबरच पायरी मार्गाचे काम देखील सुरू करण्यात आलेले आहे. मुख्य सभामंडप पुर्णत उतरविण्यात आल्यामुळे नवीन सभामंडप तयार करताना श्री भिमाशंकर येथे रोज होणारी गर्दी लक्षात घेता मंदीर दर्शनासाठी बंद केल्याशिवाय सदरील काम करणे शक्य होणार नव्हते. तसेच सदर कामांच्या अंमलबजावणीदरम्यान बांधकाम साहित्य, मोठ्या आकाराचे दगड व अन्य यंत्रसामग्री मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणावर ठेवण्यात आलेली आहे.

कामांचे स्वरूप, परिसरातील भौगोलिक परिस्थिती व भाविकांच्या मोठ्या संख्येचा विचार करता, बांधकाम सुरू असताना मंदिर दर्शनासाठी खुले ठेवणे हे सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक ठरू शकते. त्यामुळे भाविकांची सुरक्षितता अबाधित राखणे तसेच विकास आराखड्यातील कामे नियोजित कालमर्यादेत पूर्ण करणे या उद्देशाने यापूर्वी मंदिर तीन महिन्यांसाठी (महाशिवरात्रीचा कालावधी वगळून) तात्पुरते बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता.

पूर्वी भाविकांच्या सोयीचा विचार करून महाशिवरात्री कालावधी (दि. 12 फेब्रुवारी 2026 ते दि. 18 फेब्रुवारी 2026) वगळण्यात आला होता. तथापि, सध्या सुरू असलेल्या बांधकामाच्या कामाचा वेग, व्याप्ती व सुरक्षेच्या बाबींचा सखोल आढावा घेतल्यानंतर, मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात दगडी बांधकाम सुरू असल्याने तसेच दगड व बांधकाम साहित्य हलविणे शक्य नसल्यामुळे, महाशिवरात्री कालावधीत मंदिर दर्शनासाठी खुले ठेवणे सुरक्षिततेच्या दृष्टीने शक्य नसल्याचे निदर्शनास आले आहे.

श्री क्षेत्र भीमाशंकर हा अतिवृष्टीचा प्रदेश असून जून ते सप्टेंबर या कालावधीत येथे अत्यंत जास्त पावसाचे प्रमाण असते. या कालावधीत बांधकाम कामे करणे शक्य नसल्याने उपलब्ध कालावधीतच कामे पूर्ण करणे आवश्यक आहे. यामुळे विकास कामांना गती देणे अत्यंत गरजेचे आहे.

वरील सर्व बाबींचा विचार करून पूर्वी महाशिवरात्री कालावधीत मंदिर खुले ठेवण्याच्या निर्णयामध्ये बदल करण्यात आलेला असून, दि. 12 फेब्रुवारी 2026 ते दि. 18 फेब्रुवारी 2026 या महाशिवरात्री कालावधीतही श्री क्षेत्र भीमाशंकर ज्योतिर्लिंग मंदिर भाविकांच्या नित्यदर्शनासाठी बंद राहणार असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी पुणे जितेंद्र डूडी यांनी स्पष्ट केले आहे.

भाविकांनी तसेच स्थानिक नागरिकांनी सदर निर्णयाचे गांभीर्य लक्षात घेऊन मंदिर संस्थान, जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन व स्थानिक प्रशासन यांना सहकार्य करावे, असे आवाहन जितेंद्र डूडी, जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी यांनी केले आहे.ML/ML/MS

Milind

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *