विवेक भीमनवार लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी
मुंबई दि १८ : भारतीय प्रशासकीय सेवेतील ज्येष्ठ अधिकारी विवेक भीमनवार यांना आज (बुध. १८) महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्ष पदाची शपथ देण्यात आली. लोकभवन येथे झालेल्या एका छोटेखानी शपथविधी सोहळ्यात राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी भीमनवार यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.
शपथविधीनंतर राज्यपाल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भीमनवार यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. भीमनवार यांची नियुक्ती सहा वर्षांच्या कालावधीसाठी किंवा ते वयाची ६२ वर्षे पूर्ण करेपर्यंत (जे अगोदर येईल तेथपर्यंत) करण्यात आली आहे.
शपथविधी सोहळ्याला आयोगाचे माजी अध्यक्ष रजनीश सेठ, कार्यवाहू अध्यक्ष डॉ अभय वाघ, आयोगाचे सदस्य, मुख्यमंत्र्यांचे सचिव श्रीकर परदेशी, शासनाचे अधिकारी तसेच भीमनवार यांचे कुटुंबीय उपस्थित होते. सुरुवातीला राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे यांनी विवेक भीमनवार यांच्या नियुक्तीची सामान्य प्रशासन विभागाची अधिसूचना वाचली.
‘वंदेमातरम’ने शपथविधी सोहळ्याची सुरुवात
केंद्र शासनाच्या सूचनेनुसार शपथविधी सोहळ्याची सुरुवात वंदेमातरम, राष्ट्रगीत व राज्यगीताने झाली तर समारोप वंदेमातरम व राष्ट्रगीताने झाला.
Vivek Bhimanwar sworn in as Chairman of MPSC; Governor administers oath at Lok Bhavan
ML/ML/MS