भाऊबीज : ‘लाभावीण प्रीती’चे बहीण भावाचे नाते अधिक मधुर करणारा सण
-राधिका अघोर
दिवाळीचा सहावा आणि शेवटचा दिवस म्हणजे भाऊबीज. पाडव्यापासून सुरू झालेल्या कार्तिक महिन्याचा दुसरा दिवस म्हणजे, कार्तिक शुद्ध द्वितीया, म्हणजेच यमद्वितीयेला भाऊबीज साजरी करतात. आधी म्हटल्याप्रमाणे, दिवाळी हा नातेसंबंध अधिक दृढ करणारा, सर्व कुटुंबियांमधला स्नेह वृद्धिंगत करणारा उत्सव आहे. पाडव्याच्या दिवशी, स्त्रिया आपल्या पतीला आणि पित्याला ओवाळतात आणि त्यांना ओवाळणी मिळते. भाऊबीजेला बहिणी भावांना ओवाळतात. या दिवशी भाऊ बहिणीच्या घरी जातो, गोडधोड जेवण केलं जातं आणि संध्याकाळी चंद्राची कोर दिसल्यानंतर बहीण प्रथम चंद्रकोरीला आणि नंतर भावाला ओवाळते. कोणाला भाऊ नसल्यास, चंद्राला ओवाळण्याची पद्धत आहे. तसेच, बीजेची चंद्रकोर जशी वाढत जाते, तसं आपल्या भावाचे आयुष्य, समृध्दी,सुख वाढत राहो, अशी प्रार्थनाही बहिणीया दिवशी करतात. भाऊ मग ओवाळणीच्या तबकात ‘ओवाळणी’ म्हणून काहीतरी भेटवस्तू देतो. बहीणही भावाला आणि वाहिनीला भेटवस्तू देते.
या दिवशी यमराजाने आपली बहीण यमुनेच्या घरी जाऊन तिला वस्त्रे अलंकार इत्यादी वस्तू देऊन तिच्या घरी भोजन केले म्हणून या दिवसाला यमद्वितीया असंही म्हणतात. या दिवशी यमुना नदीत स्नान करणे अत्यंत पवित्र मानतात म्हणजे असे केल्यामुळे त्यावर्षी यमपासून भय नसते असा समज आहे. तशी तर भाऊबीज देशभरात साजरी केली जाते. उत्तर भारतात त्याला भाईदूज किंवा भाई टीका असेही म्हणतात. पण महाराष्ट्रात रक्षाबंधनापेक्षाही भाऊबीजेला अधिक महत्त्व आहे. लहानपणापासून एकत्र वाढलेली भावंडं, नंतर लग्न किंवा व्यवसायाच्या निमित्ताने एकमेकांपासून दुरावतात. अलीकडे तर, अत्यंत वेगवान आणि व्यस्त जीवनक्रमांत भेटीगाठी पूर्वीसारख्या होत नाहीत. म्हणूनच, अशा सणांच्या निमित्ताने भेटणं, गप्पा गोष्टी आणि सुसंवाद यातून शक्य होतो. नव्या पिढीतही स्नेहबंध निर्माण होतात. अव्यक्त भावना दाखवल्या जातात, व्यक्त केल्या जातात. कुटुंब व्यवस्था, सामुदायिक बंध आणि पर्यायाने समाज एकमेकांशी बांधून राहावा, यासाठी असे सणवार, उत्सव महत्वाचे असतात. यातून जगण्याची, संकटात परस्परांना सहकार्य करण्याची प्रेरणा आपल्याला मिळते. दिवाळी सुख समृद्धीचा, नातेसंबंध वाढवण्याचा, आनंदाचा सण आहे. त्यामुळे ह्या सणाचं स्वरूप पुष्कळ सार्वजनिक आहे. अलीकडे लोकांचं कामाचं स्वरूप बदललं आहे. सणवार देखील कामं सांभाळून केले जातात. त्यामुळे कार्यालये, मैदाने अशा नेहमीच्या भेटीगाठी होणाऱ्या स्थळी देखील दिवाळी साजरी केली जाते. सेलिब्रिटी, राजकीय नेते दिवाळी कशी साजरी करतात, हा ही लोकांच्या चर्चेचा, कुतूहलाचा विषय असतो. यंदा तर निवडणुकीचे वर्ष असल्याने, राजकीय पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबाची भाऊबीज कशी साजरी होते, हा माध्यमे, लोकांच्या चर्चेचा आणि कुतूहलाचा विषय होता. बदलत्या काळानुरूप सर्वच नातेसबंधांमधे थोडा दिखाऊपणाही आला आहे. अनेकदा, भारी भेटवस्तू, श्रीमंती यांचे प्रदर्शन मांडले जाते. दिवाळीत भरमसाठ कपडे आणि इतर खरेदी केली जाते. सणवारांचा आर्थिक फायदा व्हावा, यासाठी अशा सगळया गोष्टींची जाहिरात ही सातत्याने केली जाते. मात्र त्यातून बहीण – भावांचे स्नेहसंबंध अधिक दृढ व्हावे, हा या सणाचा मूळ हेतूच कुठेतरी दुर्लक्षित राहतो आहे का ? याचाही विचार व्हायला हवा. दिवाळी सण आनंद आणि उत्साह निर्माण करणारा, सर्वांच्याच आयुष्यातली गोडी वाढवणारा असावा ह्याच शुभेछा !!