स्वातंत्र्यवीर सावरकरांना ‘भारतरत्न’ द्या;मागणीसाठी उपोषण
धुळे दि ३० : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करावे, या प्रमुख मागणीसाठी धुळे शहरात दोन दिवसीय साखळी उपोषणाला सुरुवात झाली आहे. ‘आता नाही तर कधीच नाही?’ असा नारा देत प्रेरणा बहुउद्देशीय संस्थेने हे आंदोलन पुकारले आहे. संस्थेचे अध्यक्ष सुनील भाऊ मुरलीधर देसले यांच्या नेतृत्वाखाली जेलरोड परिसरात हे उपोषण सुरू करण्यात आले असून, अनेक कार्यकर्ते यात सहभागी झाले आहेत.

द्रष्टे राजकारणी, ओजस्वी वक्ते आणि प्रतिभाशाली साहित्यिक असलेल्या सावरकरांनी आपले संपूर्ण जीवन देशसेवेसाठी समर्पित केले. त्यांच्या या अतुलनीय योगदानाचा गौरव करण्यासाठी सरकारने आता विलंब न करता ‘भारतरत्न’ पुरस्कार जाहीर करावा, अशी तीव्र भावना आंदोलकांनी व्यक्त केली आहे. या उपोषणाच्या माध्यमातून सरकारचे लक्ष वेधून ही अनेक वर्षांपासूनची मागणी पूर्णत्वास न्यावी, हा या आंदोलनाचा मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले. या आंदोलनामुळे सावरकरांच्या ‘भारतरत्न’ पुरस्काराचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.ML/ML/MS