भारतरत्न डॉ. आंबेडकर जयंती : बाबासाहेबांचे जलव्यवस्थापन आणि वीजनिर्मितीविषयक विचार आणि कार्य आजही प्रासंगिक

राधिका अघोर
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती. भारतात त्यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. डॉ. आंबेडकर भारताला लाभलेले एक रत्नच आहेत, यात काहीच दुमत नाही. मात्र, त्यांची जयंती साजरी करतांना, केवळ उत्सवी स्वरूपात त्यांच्या पुतळ्याला हार-तुरे घालणं, हे इतकं मर्यादित स्वरूप त्यांनाही आवडलं नसतं. खरं तर त्यांचे विचार आणि कार्य इतकं मोठं आहे, की त्यांच्या दर जयंतीला त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या केवळ एका पैलूचा अभ्यास करून, आपण पुढचं वर्षभर त्या विचारानुसार काम केलं, तर भारत देश आणि समाज दोन्हीसाठी मोठे उपकार होतील. डॉ. आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त आज त्यांच्या जलव्यवस्थापनविषयक विचार आणि कार्याचा आज आढावा घेऊया.
योगायोगाने, बाबसाहेबांची जयंती, एप्रिल महिन्यात येते. आणि दरवर्षी एप्रिल महिन्यात आपल्याकडे जलटंचाई, दुष्काळ, आटलेल्या नद्या-विहिरी, यावर चर्चा सुरु होते. याच अनुषंगाने, डॉ. आंबेडकरांचे जलव्यवस्थापनाचे कार्य, अत्यंत महत्वाचे होते.
गेल्या काही वर्षांपासून आपण नद्याजोड प्रकल्पावर गांभीर्याने काम सुरू केलं आहे. मात्र अशा अनेक विधायक कल्पना शंभर वर्षांपूर्वी बाबासाहेबांनी मांडल्या होत्या. बाबासाहेबांचा उदात्त हेतू, त्यांचा दूरदृष्टीपणा, सर्वसामान्यांसमोर आलेला नाही किंवा तो आणल्या गेला नाही, असे म्हणता येईल.
आपल्याकडच्या मोठ्या नद्या दरवर्षी १,११,०१३ दशलक्ष घनमीटर पाणी समुद्रात सोडतात. या पाण्याचा वीज, वाहतूक, सिंचन यासाठी योग्य वापर केल्यास विकास होऊ शकतो. यावर बाबासाहेबांचा विश्वास होता.जलव्यवस्थापन, एक अत्यंत महत्त्वाचा घटक, जो समाजाच्या सर्व स्तरांवर परिणाम करतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सामाजिक न्याय, समानता आणि समावेशी विकासावर ठाम विश्वास होता. जलसंपत्ती ही एक मर्यादित संसाधन आहे, म्हणूनच त्याचं योग्य व्यवस्थापन सामाजिक समतेच्या दृषटिकोनातून अत्यंत आवश्यक आहे.
जलव्यवस्थापनासंबंधी बाबासाहेबांचे विचार केवळ तांत्रिक किंवा वैज्ञानिक दृष्टिकोनातून नाही, तर ते समाजाच्या विविध वर्गांसाठी न्याय, समावेश आणि समानता आणण्यासाठी महत्वाचे होते. १९४२ साली, डॉ. आंबेडकरांनी, कामगार मंत्री म्हणून कार्यभार स्वीकारला. त्यांच्याकडे त्यावेळी श्रम, सिंचन आणि वीज हे विभाग सोपवण्यात आले होते. सिंचन आणि वीजनिर्मितीसाठी, नदीजोड आणि पाण्याचे व्यवस्थापन, राष्ट्रीय सिंचन धोरण आखणे, असे नियोजन त्यांनी केले होते. त्याकाळात, बिहारमधल्या दामोदर नदीला, वारंवार येत असलेल्या पुरामुळे, मोठी जीवित आणि वित्तहानी होत असे. यावर कायमस्वरूपी उपाय करण्यासाठी बाबासाहेबांनी स्वतः अभ्यास करून, ‘दामोदर खोरे योजना’ कार्यान्वित केली.
ही कदाचित भारतातील, सर्वोत्तम जलनियोजन असलेली धरण योजना असेल. पुराच्या पाण्याचे केवळ व्यवस्थापनच नाही, तर त्यातून हरितक्रांती आणि विद्युत निर्मिती, अशा दोन्ही पैलूंचा त्यांनी सखोल विचार करून, अत्याधुनिक अशी जल विकास संकल्पना मांडली आणि अशोक कोसला, या अत्यंत अनुभवी तंत्रकुशल भारतीय अभियंत्याची नियुक्ती करून, हा प्रकल्प कार्यान्वित केला. त्याबरोबर, भाक्रा-नांगल धरण, सोन रिव्हर व्हॅली प्रकल्प, हिराकुड धरण, अशा मोठ्या जलप्रकल्पांची मूळ संकल्पनाही डॉ आंबेडकर यांचीच आहे. जलमार्ग, हा वाहतुकीचा उत्तम पर्याय असल्याचंही त्यांनी नमूद केलं होतं. त्यादृष्टीने, ह्या विभागाची जबाबदारी आल्यावर, त्यांनी, १९४७ साली जलआयोगाची स्थापना केली.
स्वतंत्र भारतात, संविधान निर्मितीची जबाबदारी आल्यावरही, त्यांनी त्यात जलधोरणाला महत्वाचे स्थान दिले. विविध राज्यांमध्ये धोरणात एकसंधता असणार नाही, हे लक्षात घेऊन, घटनेचा आराखडा तयार करताना, त्यांनी, पाणी हा विषय केंद्र सरकारच्या अखत्यारीत ठेवला. आंतरराज्य, जलविवाद कायदा, नदीखोरे प्राधिकरण कायदा असे कायदेही त्यांनीच तयार केले. सर्वच विषयांचा अत्यंत, संतुलित आणि समग्र विचार करणे, ज्याला आपण इंग्रजीत rational, म्हणतो, अशा पद्धतीने, एखाद्या विषयाची हाताळणी करणे, आणि त्याची अंमलबजावणी करतांना मात्र, अत्यंत उदात्त समानतेचा, न्यायाचा विचार समोर ठेवणे, ही बाबसाहेबांची वैशिष्ट्ये, त्यांच्या प्रत्येक विचारात आणि कर्तृत्वात आपल्याला दिसतात. केवळ बुद्धिमान माणसे, समाजाचा सहृदयतेने विचार करु शकत नाही, त्यांच्यात एक कोरडेपण असते. तर केवळ भावनिक विचार करणारी माणसे, त्यांच्या कृतीला, अभ्यासाची जोड देऊ शकत नाहीत, त्यामुळे, त्यांची कार्ये दीर्घदृष्टीची नसतात. मात्र, बाबसाहेब विलक्षण बुद्धिमान, अभ्यासू तर होतेच, हा अभ्यास आपल्या समाजासाठी आणि देशासाठी आहे, याचे त्यांना कायम भान असे.
विचार करा, एखाद्याला अस्पृश्य म्हणून पाणवठ्यावर प्रवेश नाकारला जातो, अशी व्यक्ती हातात अधिकार आल्यावर, आपला आणि आपल्या समाजाचा झालेला अपमान अवहेलना, याचा बदला घेण्याचा विचार करु शकते, आपल्यावर अन्याय करणाऱ्यांना धडा शिकवण्याचा विचार करू शकते. मात्र, बाबासाहेबांनी कधीही असा संकुचित विचार केला नाही, ते अत्यंत महान होते, खूप मोठे आणि सहृदयी देशभक्त होते, म्हणूनच, जलव्यवस्थापनाच्या विचारात, त्यांनी अत्यंत दूरदृष्टीने, समग्र समाजाच्या सर्वसमावेशक विकासाचा, समतेचा विचार केला. आजच्या सर्वसमावेशक, विकसित भारताच्या प्रवासाचा पाया, त्यांनीच रचला आहे .
अशी व्यक्ती भारतात जन्मली याचा आपल्याला अभिमानही असायला हवा आणि त्यांचा स्वप्नातला समाज घडवून आपण त्यांचे ऋणही फेडायला हवे.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा !