वाशीम जिल्ह्याच्या वेशीवर ऐतिहासिक पद्धतीने झाले भारत जोडो यात्रेचे स्वागत.
वाशिम, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क): कन्याकुमारी पासून काश्मीर पर्यंत निघालेली राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचे वाशीममध्ये आज सकाळी आगमन झाले. या यात्रेचे स्वागत करण्यासाठी विदर्भ आणि मराठवाड्याच्या सीमेवर ऐतिहासिक लाल किल्ल्याची प्रतिकृती साकारण्यात आली होती.Bharat Jodo Yatra was welcomed in a historic manner at the gates of Washim district.
सकाळी ६ वाजता पैनगंगा नदीची सिमा ओलांडून हजारो पदयात्रीनी वाशीम जिल्ह्यात प्रवेश केला. यावेळी पारंपारिक बंजारा नृत्य, आदिवासी नृत्याने जिल्ह्याच्या वेशीवर राहुल गांधी यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी कॉंग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले, जिल्हाध्यक्ष आमदार अमित झनक, प्रदेश कार्यकारिणी सरचिटणीस दिलीप सरनाईक यांची उपस्थिती होती.
सकाळी वाशीम जवळील बोराळा हिस्से येथील कॅंप ३ वर भोजन, विश्रांती तसेच बिरसा मुंडा यांची जयंती साजरी करून सायंकाळच्या सुमारास वाशीम शहरात भारत जोडो यात्रा सुरू आहे. वाशीम शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात आयोजित कॉर्नर मिटिंगला खा.राहुल गांधी संबोधित करतील.
वाशीम येथील रामराव सरनाईक समाजकार्य महाविद्यालयाच्या प्रांगणात रात्रीचा मुक्काम आटोपून १६ नोव्हेंबर रोजी मालेगांव मेडशीमार्गे भारत जोडो यात्रा अकोला जिल्ह्याकडे मार्गस्थ होणार आहे.
ML/KA/PGB
15 Nov .2022