गणेश चतुर्थीला भामरागड जलमय..

गडचिरोली दि २७:– गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुका पुन्हा एकदा पुराच्या विळख्यात अडकला आहे. कालपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसाबरोबरच छत्तीसगड राज्यात झालेल्या जोरदार पावसामुळे पर्लकोटा, पामूलगौतम आणि इंद्रावती नद्या प्रचंड वेगाने वाहू लागल्या आहेत. यामुळे भामरागडचा जगाशी संपर्क पूर्णपणे तुटला आहे. पुलं पाण्याखाली गेले आहेत, रस्ते बंद झाले आहेत आणि लोक अक्षरशः कैदेत सापडले आहेत.
या बिकट परिस्थितीत मात्र मानवी जीवन वाचविण्याची पहाटे साडेचार वाजताच्या सुमारास हिंदेवाडा येथील एका गर्भवती महिलेची प्रकृती बिघडली. आजूबाजूला फक्त पुराचं पाणी, रस्ते बंद आणि कुठलाही मार्ग नसताना SDRF च्या जवानांनी जीवाची पर्वा न करता बोटीने पूर फाडत त्या महिलेला सुरक्षित बाहेर काढलं आणि थेट भामरागड ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं.
आज ती महिला आणि तिच्या पोटी वाढणारं नवजीवन सुरक्षित आहे आणि त्यामुळे SDRF च्या या धाडसी मोहिमेचं संपूर्ण जिल्ह्यात कौतुक होत आहे. दरम्यान, भामरागडच्या मुख्य बाजारपेठेत पर्लकोटा नदीचं पाणी शिरलं आहे. तब्बल ३० ते ३५ दुकाने पाण्यात गेली आहेत. व्यापाऱ्यांनी कालच रात्री साहित्य सुरक्षित ठिकाणी हलवले असल्यामुळे मोठं नुकसान टळलं, पण बाजारपेठेत उसळलेल्या पाण्याचा वेग पाहून नागरिक हादरले आहेत.
प्रश्न असा की, दरवर्षी पावसाळ्यात अशीच परिस्थिती उद्भवते. पर्लकोटा नदीवरील विद्यमान पूल उंचीने अपुरा असल्यामुळे किमान तीन ते चार वेळा भामरागडचा संपर्क तुटतो. स्थानिकांच्या हालअपेष्टा वाढतात, रुग्ण अडकतात, आणि कधी कधी जीव वाचवण्यासाठी अशी धाडसी मोहिम हाती घ्यावी लागते. सध्या नवीन पुलाचं बांधकाम सुरू आहे, पण तो पूर्ण होईपर्यंत लोकांना जीव मुठीत धरूनच जगावं लागत आहे.ML/ML/MS