भद्रावतीचे तहसीलदार आणि नायब तहसीलदार निलंबित..!

 भद्रावतीचे तहसीलदार आणि नायब तहसीलदार निलंबित..!

चंद्रपूर दि ४ :- भद्रावती तालुक्यातील मौजा कुरोडा येथील जमिनीच्या मालकी प्रकरणात न्यायालयाच्या स्पष्ट आदेशाची अंमलबजावणी न करता, ‘मालकी हक्काबाबत वाद आहे’ असा ठपका ठेवत प्रकरण निकाली न काढल्याने भद्रावतीचे तहसीलदार राजेश भांडारकर आणि नायब तहसीलदार सुधीर खांडरे यांच्यावर महसूल व वन विभागाने मोठी कारवाई करत दोघांनाही तत्काळ निलंबित केले आहे. विशेष म्हणजे, काम होत नसल्याने त्रस्त होऊन शेतकरी परमेश्वर ईश्वर मेश्राम यांनी २६ सप्टेंबर रोजी तहसील कार्यालयात विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यांच्यावर चंद्रपूरच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सूत्रांनी सांगितले.

न्यायालयाच्या आदेशानुसार अर्जदार परमेश्वर मेश्राम आणि त्यांच्या वारसांची नावे गाव नमुना ७ मध्ये नोंदवली जाणे अपेक्षित होते. मात्र, महसूल अधिकाऱ्यांनी आदेश पाळला नाही. याबाबत महसूल अधिनियम १९६६ आणि नागरी सेवा वर्तणूक नियम १९७९ च्या नियमांचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. राजेश भांडारकर आणि सुधीर खांडरे यांना महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम १९७९ अंतर्गत विभागीय चौकशीच्या अधीन निलंबित करण्यात आले असून, निलंबन कालावधीतील मुख्यालय जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर राहणार आहे. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांची पूर्वसंमती घेतल्याशिवाय मुख्यालय सोडता येणार नसल्याचे पत्रात नमूद आहे.निलंबन कालावधीत खासगी नोकरी अथवा व्यवसाय करण्यास बंदी असून, नियम उल्लंघन केल्यास निलंबन भत्ता रद्द करण्यात येणार आहे. निलंबन आदेश महसूल विभागाचे अवर सचिव प्रवीण पाटील यांच्या स्वाक्षरीने जारी करण्यात आला.

ML/ML/SL
4 Oct. 2025

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *