बीड जिल्ह्यातील माजलगाव आणि मांजरा धरणातून पाण्याचा विसर्ग

बीड दि १६ …..बीड जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसामुळे माजलगाव आणि मांजरा धरण पूर्ण क्षमतेने भरले आहेत. त्यामुळे दोन्ही धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. सिंधफणा आणि मांजरा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
जिल्ह्यात परतीच्या पावसानं दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे अनेक लहान-मोठे प्रकल्प तुडुंब भरले आहेत. याच पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यातील प्रमुख प्रकल्पांपैकी एक असलेल्या माजलगाव धरणातून सध्या ६९,८४२ क्यूसेक्स (१९७७.६९ क्युमेक्स) इतका पाण्याचा विसर्ग सिंधफणा नदीपात्रात सुरू आहे. यामुळे नदीच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ झाली आहे. नदीपात्रातील पाण्याचा वाढता प्रवाह पाहता, नदीकाठच्या गावांना अधिक काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
त्याचप्रमाणे, मांजरा धरणातूनही पाण्याचा विसर्ग सुरू आहे. सध्या या धरणातून १४,५०८.१७ क्यूसेक्स (४१०.८८ क्युमेक्स) इतका विसर्ग मांजरा नदीत सोडण्यात येत आहे. या दोन्ही नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाल्याने प्रशासनाने पूरस्थितीवर बारीक लक्ष ठेवले आहे.ML/ML/MS