बीड मधील हत्येप्रकरणी भाजपाचा रोख धनंजय मुंडेंवर…

 बीड मधील हत्येप्रकरणी भाजपाचा रोख धनंजय मुंडेंवर…

नागपूर, दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बीड आणि परभणी या ठिकाणी झालेल्या हिंसाचार आणि हत्ती प्रकरणी आज विधानसभेत अल्पकालीन चर्चा झाली. या चर्चेदरम्यान भाजपाच्या सदस्यांनी बीड मधील हत्येप्रकरणी, मंत्री धनंजय मुंडे यांचे हस्तक थेट सहभागी असल्याचा आरोप केला. अर्थात याप्रकरणी मुंडे यांचे नाव मात्र त्यांनी घेतले नाही, मात्र यातून भाजपाने धनंजय मुंडे यांना अडचणीत आणल्याचे स्पष्ट झाले आहे .

परभणी येथे संविधान शिल्पाची विटंबना झाल्या प्रकरणी आणि आरोपी सोमनाथ सूर्यवंशी याचा पोलीस कोठडीत झालेला मृत्यू, त्यासोबतच बीड येथे सरपंचाची झालेली क्रूर हत्या या संदर्भात आज विरोधी पक्षाच्या वतीने नियम 101 अन्वये अल्पकालीन चर्चा उपस्थित करण्यात आली होती. या चर्चेची सुरुवात काँग्रेसच्या नितीन राऊत यांनी केली. त्यांचा संपूर्ण भर परभणी येथील कोठडीतला मृत्यू आणि त्यानंतर पोलिसांनी केलेला अतिरेक यावर होता.

मात्र भाजपाचे बीड मधील सदस्य सुरेश धस आणि नमिता मुंदडा यांनी थेट बीड मधील कायदा सुव्यवस्था पूर्णतः बिघडले असल्याचा आरोप केला. बीड मधील पोलिसांना कोण नियंत्रित करीत आहे.बीड यामुळे बदनाम होत आहे, ही परिस्थिती बदला, मुख्यमंत्र्यांनी यात कठोर कारवाई करून गुन्हेगारांना कडक शिक्षा होईल याची काळजी घ्यावी अशी मागणी करत कोणाचेही नाव घेतले नाही. मात्र त्यांचा रोख हा थेट मंत्री धनंजय मुंडे आणि त्यांचे सहकारी यावर होता हे मात्र स्पष्ट झाले आहे .

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मंत्री धनंजय मुंडे यांचे सहकारी असणारे वाल्मीक कराड यांचे थेट नाव घेतले आणि मुख्यमंत्र्यांनी मुंडे यांना मंत्रिमंडळातून थेट बडतर्फ करावे. आपण अत्यंत संवेदनशील आहोत असे सिद्ध करून द्यावे अशी मागणीच सभागृहात मुख्यमंत्र्यांकडे केली.भाजपाचे सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांनी सरपंच देशमुख याची ज्या पद्धतीने क्रूर हत्या झाली त्याचे वर्णनच सभागृहात केले, त्यावेळी सभागृहामध्ये भयाण शांतता पसरली होती असे दिसून आले .

विधिमंडळाचे कामकाज सुरू झाल्यापासून विरोधी पक्षाने हे दोन्ही विषय लावून धरले आहेत. यादरम्यान धनंजय मुंडे मात्र सभागृहामध्ये फारसे फिरकलेलेच नाहीत. याप्रकरणी आता मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आणि पक्षप्रमुख म्हणून अजित पवार नेमकी काय भूमिका घेतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

ML/ML/PGB
18 Dec 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *