असीम सरोदे यांची सनद रद्द करण्याच्या निर्णयाला BCI ची स्थगिती
नवी दिल्ली, दि. १८ : विधिज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते असीम सरोदे यांची वकिली सनद रद्द करण्याच्या बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाच्या निर्णयाला बार कौन्सिल ऑफ इंडियाने स्थगिती दिली आहे. यामुळे असीम सरोदे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. प्रस्तुत प्रकरण खरोखरच व्यावसायिक गैरवर्तनुकीचे आहे का? याचा सखोल अभ्यास करूनच योग्य तो निर्णय घ्यायला हवा होता, असे मत बार कौन्सिल ऑफ इंडियाने या प्रकरणी म्हटले आहे.
असीम सरोदे यांनी एका सार्वजनिक कार्यक्रमात न्यायव्यवस्था, राज्यपाल व विधानसभा अध्यक्ष यांच्या संदर्भात आक्षेपार्ह विधान केले होते. त्यामुळे महाराष्ट्र कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाने त्यांची वकिलीची सनद 3 महिन्यांसाठी रद्द केली होती. सरोदे यांनी या निर्णयाला बार कौन्सिल ऑफ इंडियाकडे (बीसीआय) आव्हान दिले होते. त्यांच्या अर्जावर सुनावणी करताना बार कौन्सिल ऑफ इंडियाने महाराष्ट्र कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाच्या निर्णयाला स्थगिती दिली. बीसीआयने या प्रकरणी महाराष्ट्र बार कौन्सिलचे चांगलेच कान टोचल्याची माहिती आहे. हे प्रकरण खरोखरच व्यावसायिक गैरवर्तनुकीचे आहे का? याचा सखोल तपास करूनच योग्य तो निर्णय घ्यायला हवा होता, असे निरीक्षण या प्रकरणी बीसीआयने नोंदवले.
वकील असीम सरोदे यांनी बार कौन्सिल ऑफ इंडियाच्या निर्णयावर आनंद व्यक्त केला आहे. सत्याचा विजय होण्याची सुरुवात कधीतरी होत असते. बार कौन्सिल ऑफ इंडियाचे आभार. मी पुन्हा येतोय, असे ते म्हणाले.
SL/ML/SL