चीनमध्ये आंदोलकांकडून बीबीसीच्या पत्रकाराला मारहाण
बिजिंग-चीन, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या झिरो कोव्हिड पॉलिसीच्या विरोधात चीनी नागरीकांकडून प्रचंड निदर्शने सुरू आहेत. चीनची राजधानी बिजिंगसह शांघाय, चेंगडू, वुहान आणि शिआन या महत्त्वांच्या शहरांमध्ये आंदोलक हजारोंच्या संख्येने रस्त्यावर उतरले आहेत.
मागील काही दिवसांपासून चीनमध्ये पुन्हा एकदा करोना संसर्ग वाढत आहे. करोनाग्रस्तांची संख्यादेखील दिवसेंदिवस वाढत आहे. याच कारणामुळे चीनमध्ये लॉकडाऊन आणि इतर प्रतिबंधात्मक उपायांची अंमलबजावणी केली जात आहे. मात्र येथे चीनमध्ये टाळेबंदीला कडाडून विरोध होत आहे.
BBC journalist beaten by protesters in China Chinese Protest against zero COVID Policy
शांघायमध्ये हजारो लोकांनी एकत्र येत कोव्हिडच्या कठोर निर्बंधांचा निषेध केला. काहींनी अध्यक्ष शी जिनपिंग यांना पायउतार होण्याचं आवाहन केलं. शांघाय येथील निषेध आंदोलन कव्हर करताना चीनच्या पोलिसांनी बीबीसीच्या पत्रकाराला अटक करून मारहाण केली आहे.
बीबीसीनं याविषयी पत्रक जारी करत म्हटलंय, “बीबीसीचे पत्रकार एड लॉरेन्स यांना ज्या पद्धतीची वागणूक देण्यात आली, त्याबाबत बीबीसी चिंता व्यक्त करत आहे. शांघाय येथे निषेध आंदोलन कव्हर करत असताना लॉरेन्स यांना अटक करण्यात आली. त्यांना काही तास अटकेत ठेवून मग सोडण्यात आलं. या अटकेदरम्यान, पोलिसांनी त्यांना मारहाण केली. लाथही मारली. एक अधिकृत पत्रकार म्हणून काम करत असताना हे घडलं आहे.”
SL/KA/SL
28 Nov. 2022