येत्या बुधवारी ‘बरवे संचित’चे प्रकाशन
मुंबई, दि. ५ : प्रख्यात चित्रकार प्रभाकर बरवे यांच्यावरील ‘बरवे संचित’ या सुमारे ४०० पानी ग्रंथाचं तसेच ‘गेले द्यायचे राहून’ या सतीश नाईक यांनी लिहिलेल्या पुस्तकाचं प्रकाशन बुधवार दिनांक ८ एप्रिल रोजी रात्री ८:३० वाजता नामवंत चित्रकार अतुल डोडिया यांच्या हस्ते मुंबईतील प्रभादेवीच्या रवींद्र नाट्य मंदिरात होणार आहे. ज्येष्ठ पत्रकार पद्मश्री कुमार केतकर यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या प्रकाशन सोहोळ्यात ज्येष्ठ पत्रकार दिनकर गांगल, साहित्य संस्कृती मंडळाच्या सचिव चित्रकार डॉ मीनाक्षी पाटील, चित्रकार अतुल डोडिया, शिल्पकार रवींद्र जोशी आणि या ग्रंथाचे संपादक चित्रकार सतीश नाईक यांची भाषणं होणार आहेत. या प्रसंगी प्रभाकर बरवे यांच्या कवितांचं, तर कवी आणि चित्रकार नितीन दादरावाला यांच्या बरवे यांच्यावरील कवितांचं सादरीकरण अनुक्रमे प्रख्यात अभिनेते किशोर कदम आणि मनोज जोशी हे करणार आहेत. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रा. डॉ. नीतिन आरेकर हे करणार आहेत.
या कार्यक्रमाच्या प्रारंभी चित्रकार आशुतोष आपटे हे प्रभाकर बरवे यांच्या गाजलेल्या ‘कोरा कॅनव्हास’ या पुस्तकावर आधारित रंगमंचीय आविष्कारात बरवे यांची पेंटिग्ज, रेखाटनं, लेखन यांचा वापर करून मांडणी शिल्प आणि सादरीकरणाचा अभिनव प्रयोग करणार आहेत. अशा प्रकारच्या सादरीकरणाचा हा रंगमंचावरचा पहिलाच आविष्कार ठरणार आहे. या कार्यक्रमास बरवे यांच्या चाहत्या वाचकांनी तसेच चित्रकार आणि कला विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावं असं आवाहन ‘चिन्ह’ने केलं आहे.
या प्रकाशन सोहळ्यास सायंकाळी ५:१५ वाजता सुरुवात होणार असून प्रारंभी पुण्याच्या झपूर्झा वस्तू संग्रहालयाच्या वतीनं ‘बरवेंची पानं’ हा दृक् श्राव्य नाटयानुभव देणारा अभिवाचनाचा कार्यक्रम रवींद्र नाट्य मंदिराच्या मिनी नाट्यगृहात होणार आहे. या कार्यक्रमाची संहिता, संकलन आणि दिग्दर्शन शेखर नाईक यांनी केलं आहे. या कार्यक्रमाला अथर्व वडके यांनी संगीत दिलं आहे, तर सागर कानोले आणि नितीन अग्निहोत्री हे अभिनेते प्रत्यक्ष अभिवाचन करणार आहेत. हा कार्यक्रमदेखील सर्वांसाठी खुला आहे.ML/ML/MS