बन्सी घेवडे : आदिवासींचा खराखुरा मित्र व पाठीराखा !

 बन्सी घेवडे : आदिवासींचा खराखुरा मित्र व पाठीराखा !

मुंबई दि १ : आदिवासींचे खरेखुरे मित्र बन्सी घेवडे यांचे 29 सप्टेंबर, 2025 रोजी रात्री 8.30 वाजतां हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले. त्यांचे वय केवळ 58 वर्षांचे होते. बन्सी घेवडे हे कर्जत येथे राहत होते. सामाजिक कार्यात त्यांना विशेष स्वारस्य असल्याने सुरुवातीपासून त्यांच्या पत्नी जिजाताई रेरे यांच्या सोबत आदिवासी कातकरी यांच्या उत्थानासाठी स्वतःला झोकून दिले होते. काही वर्षांपूर्वीच जिजाताई रेरे यांचे निधन झाले होते.

या दाम्पत्याने सुरुवातीला जागृत कष्टकरी संघटना व दिशा केंद्र या संघटनांमध्ये काही काळ व्यतीत केल्यानंतर ते अकॅडमी ऑफ डेव्हलपमेंट सायन्स या संस्थेत काही काळ कार्यरत होते. त्यांनी आदिवासी कातकरी प्रतिष्ठान या संघटनेची स्थापना त्यांनीच केली होती. शोषित जन आंदोलन या संघटनांच्या समन्वय संघटनेत त्यांचा सक्रीय सहभाग होता. आदिवासींचे जीवन मरणाचे प्रश्न – रोजगार हमी-
शेतमजुरी, वीटभट्टी कामगार इत्यादींचे किमान वेतनाचे प्रश्न तसेच दळी – एक साली व वन जमिनीच्या प्रश्नांवर त्यांचा सखोल अभ्यास आणि काम होते.

स्वातंत्र्यसैनिक व तत्कालीन तहसीलदार रा वि भुस्कुटे यांनी सुरू केलेल्या वेठबिगार मुक्ती मोहीमेमध्ये त्यांचा सक्रीय सहभाग होता. अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या अंमलबजावणीसाठी त्यांचे प्रमुख योगदान होते. किसन पवार या कातकरी आदिवासीला रक्तबंबाळ होईपर्यंत प्रचंड मारहाण केल्या प्रकरणी बन्सी घेवडे यांनी बेशुद्ध झालेल्या किसनला आपल्या दोन हातावर उचलून पोलीस स्टेशन मध्ये नेला होता. जोपर्यंत गुन्हा दाखल होणार नाही तोपर्यंत रुग्णालयात दाखल करणार नाही अशी भूमिका घेतली होती. परिणामी गुन्हेगारांवर अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये पुन्हा दाखल करण्यात आला होता. तोच किसन पवार नंतर कडा ग्रामपंचायत सरपंच झाला किसन पवार यांच्या पत्नी नंतर 2022 23 च्या सुमारास पंचायत समितीच्या उपसभापती झाल्या होत्या. आदिवासींवर अन्याय आणि अत्याचार झाला तर त्या विरोधात दाद फिर्याद मिळवण्यासाठी आवाज उठवत असे.

आदिवासी उत्थानाचा ध्यास घेतलेल्या बन्सी घेवडे यांनी देशभर दौरे केले होते. विजय साठे, बन्सी यांस गमतीने नाग्या कातकरी आणि स्वतःला पांढरा कातकरी म्हणत असत. विशेष म्हणजे आदिवासींच्या जमिनीविषयक प्रश्नांचे ते गाढे अभ्यासक होते. दळी – एकसाली जमिनी, वन जमिनींसाठीचे आदिवासींचे दावे भरण्यामध्ये आणि दाखल करण्यामध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडली होती. ते आदिवासी आणि कातकरींच्या प्रश्नात पूर्णपणे समरस झाले होते. अकॅडमी ऑफ डेव्हलपमेंट सायन्स या संस्थेद्वारे प्रकाशीत करण्यात आलेल्या “कातकरी” या पुस्तकाचे डॉक्टर विजय साठे यांच्या सोबत त्यांनी लेखन केले होते.

सुमारे अडीचशे कातकरी वाड्या पायाखाली घालून गोळा केलेल्या माहितीवर आधारित उपलब्ध असलेले कातकरीं विषयीच्या संशोधनावर आधारीत माहितीने परीपुर्ण असलेले हे एकमेव पुस्तक आहे आदिवासींमध्ये प्रबोधन करणे, त्यांच्या प्रश्नावर लेखन करणे आणि प्रत्यक्ष जनतळात जाऊन कार्य करणे अशी त्रिसूत्री बन्सी घेवडे आणि विजय साठे यांच्या आदिवासी उत्थान कार्याची होती. कातकरींच्या कुपोषणावर संशोधन अभ्यास करीत असताना डाॅ.विजय साठे आणि बन्सी घेवडे यांचे मार्गदर्शन आणि सहकार्य मला लाभले.

बन्सी भाऊने कर्जत आणि शहापूर तालुक्यातील माहीती संकलन करण्यासाठी प्रत्यक्ष कातकरी वाड्यांवर दौरे केले होते. स्वतः वकील असलेल्या विजय साठे यांचे अलीकडेच निधन झाले आहे. त्यांच्या पाठोपाठ त्यांचे सखेसोबती बन्सी घेवडे हे देखील अचानक जग सोडून निघून गेले.
आदिवासी कातकरी जमातीसाठी झटणारे दोन खंदे पाठीराखे निघून गेल्याने ठाणे व रायगड मधला आदिवासी कातकरी समाज पोरका झाला असल्याबाबतच्या प्रतिक्रिया आदिवासी समाजात सर्वत्र ऊमटत आहेत.ML/ML/MS

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *