दक्षिणेतील या मंदिरांच्या पूजेत ऑलिंडरच्या फुलांच्या वापरावर बंदी
तिरुवनंतपूरम, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केरळमधील बहुतेक मंदिरांचे व्यवस्थापन करणाऱ्या दोन प्रमुख देवस्वोम मंडळांनी नुकतेच मंदिरांना प्रसादासाठी ऑलिंडरच्या फुलांचा वापर थांबवण्याचे निर्देश दिले आहेत. त्रावणकोर देवस्वोम बोर्ड (टीडीबी) आणि मलबार देवस्वोम बोर्डाने या फुलांच्या विषारी स्वरूपाबद्दल चिंता लक्षात घेऊन हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या फुलांमुळे मानव आणि प्राण्यांना इजा होऊ शकते, असे मंडळाने म्हटले आहे. TDB चे अध्यक्ष पीएस प्रशांत यांनी पत्रकारांना सांगितले की, “TDB अंतर्गत नैवेद्य (देवाला अर्पण केलेल्या वस्तू) आणि मंदिरांमध्ये प्रसादात ऑलिंडरच्या फुलांचा वापर पूर्णपणे टाळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याऐवजी तुळशी, थेची (इक्सोरा), चमेली आणि गुलाब यांसारखी इतर फुले वापरली जातील.
मलबार देवस्वोम बोर्डाचे अध्यक्ष एम आर मुरली यांनी सांगितले की, त्यांच्या अधिकारक्षेत्रातील १४०० हून अधिक मंदिरांमध्ये विधींसाठी ऑलिंडरच्या फुलांच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे. अलाप्पुझा आणि पठाणमथिट्टा येथे झालेल्या अनेक घटनांनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. अलाप्पुझा येथील एका महिलेचा नुकताच ऑलिंडरची फुले आणि पाने खाल्ल्याने मृत्यू झाला. दोन दिवसांपूर्वी पाथनमथिट्टा येथे ऑलिंडरची पाने खाल्ल्याने गाय आणि वासराचा मृत्यू झाल्याच्या बातम्याही समोर आल्या होत्या.
नेरियम ऑलिंडर ज्याला सामान्यतः ओलेंडर किंवा रोझबे म्हणून ओळखले जाते, ही एक वनस्पती आहे, जी जगभरात उष्णकटिबंधीय आणि समशीतोष्ण प्रदेशात आढळली जाते. खरं तर हे झाड बहुतेक वेळा शोभेच्या आणि लँडस्केपिंगसाठी वापरले जाते. केरळमध्ये ऑलिंडर वनस्पती अरली आणि कनावीरम या नावांनी ओळखली जाते. तसेच नैसर्गिकरीत्या महामार्ग आणि समुद्रकिनाऱ्यावर ती उगवली जाते. ऑलिंडरच्या वेगवेगळ्या जाती आहेत, प्रत्येकाला वेगळ्या रंगाचे फूल आहे.
आयुर्वेदानुसार ऑलिंडर विषाक्ततेसाठीसुद्धा जगभरात ओळखली जाते. ऑलिंडरच्या विषारीपणाच्या परिणामांमध्ये मळमळ, अतिसार, उलट्या, पुरळ, चक्कर येणे, हृदयाचे अनियमित ठोके, मंद हृदयाचे ठोके अशी लक्षणे पाहायला मिळतात. न्यूयॉर्कच्या माउंट सिनाई हॉस्पिटलने दिलेल्या माहितीनुसार, “लक्षणे १ ते ३ दिवस पाहायला मिळतात आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये राहण्याची आवश्यकता भासू शकते. परंतु मृत्यूचे प्रमाण कमी आहे.”