शिधावाटप दुकांनामध्ये यापुढे मिळतील बँकिंग सेवा

मुंबई, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राष्ट्रीयकृत बँका, इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक, टपाल विभाग, संचार मंत्रालय, भारत सरकार व खाजगी बँका आदी सर्व नागरी सेवा राज्यातील सर्व शिधावाटप आणि रास्त भाव दुकांनामधून देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती अन्न व नागरी पुरवठा मंत्री रविंद्र चव्हाण यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
राज्यामध्ये सुमारे ५० हजार शिधावाटप / रास्त भाव दुकाने असून त्याचा फायदा शहरासह ग्रामीण भागातील जनतेला होणार असल्याचेही चव्हाण यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्वात सुलभ, परवडणारी, आणि विश्वासार्ह बॅंक बनण्याच्या दृष्टीकोनातून इंडिया पोस्ट पेमेंटस बॅंक ची सुरुवात केली. धन हस्तांतरण, थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी), बिल भऱणा, आरटीजीएस आदी सुविधा या बॅंकेतर्फे देण्यात येतात. याच अनुषंनाने या सेवा सुरु करण्यात येणार आहेत असे ते म्हणाले.
सर्व बँकामार्फत जाणा-या दिल्या जाणा-या सेवा रास्त भाव दुकांनामार्फत दिल्या जाणार असून या माध्यमातून रास्त भाव दुकानदारांचे उत्पन्नही सुधारणार आहे. या उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजाणीसाठी रास्त भाव दुकानदारांमध्ये जागरुकता निर्माण करुन येथे शक्य असेल तेथे बँकेच्या सेवा सुरु करण्यात येणार आहे.
विशेष म्हणजे आधार कार्डमध्ये दुरुस्ती करण्याची कार्यवाही या शिधावाटप दुकानांमध्ये करण्यात येणार आहे. तसेच विविध बँकाची उत्पादने तसेच सेवा या ठिकाणी उपलब्ध होणार आहे. राज्यातील सर्व शिधावाटप दुकानामध्ये ऐच्छिकरित्या बँकेचे व्यावसायिक प्रतिनिधी म्हणून नियुक्त करता येणार आहेत अशी माहिती देताना मंत्री चव्हाण यांनी सांगितले की, शहरांमध्ये असणारी दुकानं त्यांना भाडं परवडत नाही. दुकानदारांना मिळणारे कमिशन अल्प आहे, त्यामुळे सर्व आर्थिक मेळ जमवणे कठीण होते.म्हणून त्यांचे उत्पन्न वाढवणे त्यासाठी उपाय योजना करणं गरजेचं होते, त्याचासाठीच एक नवी व्यवस्था उत्पन वाढीसाठी केली आहे. त्याप्रमाणे ग्रामीण भागातील जनतेला या सुविधांचा लाभ होणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरु केलेल्या पीएम वाणी या उपक्रमाच्या माध्यमातून शिधावाटप दुकानांमध्ये पीएम-वाणी चे युनिट बसविण्यात येईल. या माध्यमातून रास्त दरात त्या दुकानांच्या परिसरातील जनतेला वाय-फाय सुविधेचा फायदा ख-या अर्थाने मिळणार आहे. तसेच ही बॅंकिंगच्या या सुविधा प्रत्यक्ष दुकानांमध्ये सुरु करण्यापूर्वी सदर सुविधेच्या वापराबाबत शिधावाटप रास्त भाव दुकानदार यांना संबंधित बॅंकेच्या माध्यमातून प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे संबंधित बँकेमार्फत या उपक्रमाची अंमलबजावणी, सुविधा व समन्वयासाठी राज्य स्तरावर तसेच जिल्हा स्तरावर नोडल अधिकारी नियुक्त करण्यात येणार आहे. असेही रवींद्र चव्हाण यांनी यावेळी सांगितले.
ML/KA/SL
22 June 2023