अनिल अंबानींच्या कंपनीची बँक खाती होणार बंद
मुंबई, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भांडवली बाजार नियामक SEBI ने अनिल अंबानींच्या मालकीच्या रिलायन्स बिग एंटरटेनमेंटचे बँक खाती तसेच शेअर्स आणि म्युच्युअल फंड होल्डिंग्स गोठवण्याचे आदेश दिले आहेत. 26 कोटींची थकबाकी वसूल करण्यासाठी सेबीने हा आदेश दिला आहे. हा दंड तीन महिन्यांपूर्वी अनिल अंबानींच्या कंपनी रिलायन्स होम फायनान्स लिमिटेड (RHFL)शी संबंधित प्रकरणात लावण्यात आला होता. अनिल अंबानी यांनी RHFL अधिकाऱ्यांच्या मदतीने पैशांची उधळपट्टी केल्याचे सेबीला अलीकडेच त्यांच्या तपासात आढळून आले होते.
SEBI ने 14 नोव्हेंबर रोजी रिलायन्स बिग एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड (आता RBEP एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड म्हणून ओळखले जाते) ला नोटीस पाठवली होती आणि 15 दिवसांच्या आत थकबाकी भरण्यास सांगितले होते. दंड भरू न शकल्याने आता सेबीने हा नवा आदेश दिला आहे. सेबीच्या सूचनेनुसार, रिलायन्स बिग एंटरटेनमेंटच्या 26 कोटी रुपयांच्या थकबाकीमध्ये व्याज आणि वसुली खर्चाचा समावेश आहे.
तीन महिन्यांपूर्वी सेबीने निधीचा गैरवापर केल्याप्रकरणी अनिल अंबानी यांच्यावर रोखे बाजार (शेअर मार्केट, डेट, डेरिव्हेटिव्ह) 5 वर्षांसाठी बंदी घातली होती. त्यानंतर अंबानींना 25 कोटी रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आणि त्यांना कोणत्याही लिस्टेड कंपनीत संचालक म्हणून काम करण्यासही बंदी घालण्यात आली.
रिलायन्स होम फायनान्स कंपनीवर ६ महिन्यांची बंदी घालण्यात आली असून ६ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. सेबीने जारी केलेल्या 222 पानांच्या अंतिम आदेशानुसार, अनिल अंबानी यांनी आरएचएफएल अधिकाऱ्यांच्या मदतीने पैशांची उधळपट्टी केल्याचे तपासात समोर आले आहे. त्यांनी स्वत: निधीचा वापर केला, मात्र हा निधी कर्ज म्हणून दिल्याचे भासवले.
SL/ML/SL
3 Dec. 2024