बांगलादेशचा आडमुठेपणा – भारतात होणाऱ्या टी 20 वर्ल्ड कपवर टाकला बहिष्कार
मुंबई, दि. २२ : भारतामध्ये होणाऱ्या टी-२० विश्वचषक स्पर्धेला बांगलादेशने बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे क्रिकेटविश्वात मोठी खळबळ उडाली आहे. बांगलादेश क्रिकेट बोर्डाने जाहीर केले की, काही राजकीय व कूटनीतिक कारणांमुळे त्यांनी या स्पर्धेत सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. भारतात होणाऱ्या स्पर्धेतून माघार घेणे हे केवळ क्रीडा क्षेत्रापुरते मर्यादित नसून, दोन्ही देशांमधील संबंधांवरही त्याचा परिणाम होऊ शकतो. विशेष म्हणजे, बांगलादेशने यापूर्वीही काही आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये राजकीय कारणांमुळे सहभाग नाकारला होता. मात्र, विश्वचषकासारख्या मोठ्या स्पर्धेतून माघार घेणे हे अत्यंत गंभीर मानले जात आहे.
मुस्तफिजूर रहमानला आयपीएलमधून वगळण्यात आल्यावर बांगलादेश क्रिकेट बोर्डाने आपली प्रतिष्ठा राखण्यासाठी आपले सामने भारताऐवजी श्रीलंकेत खेळवावेत, अशी भूमिका मांडली होती. यासोबतच बांगलादेशने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला (ICC) त्यांचा ग्रुप बदलण्याची मागणी केली होती; मात्र, आयसीसीने ही मागणी फेटाळून लावली.
बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, सुरक्षा संबंधित कारणास्तव बांगलादेश सरकारने भारतात क्रिकेट सामने खेळण्यास परवानगी न देणे योग्य ठरेल. बांगलादेश सरकारचा हा निर्णय असून, तो बोर्डाचा नाही, असेही स्पष्ट करण्यात आले.यामुळे भारतात होणाऱ्या टी २० वर्ल्ड कपमध्ये बांगलादेश संघ सहभागी होणार नाही, आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला यावर पुढील पावले उचलावी लागणार आहेत.
SL/ML/SL