बांगलादेशात लष्करी राजवट, पंतप्रधान शेख हसीना देशाबाहेर
ढाकादि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :बांगलादेशमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार उसळल्यानंतर बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी आज (दि.५ ऑगस्ट) आपल्या पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर शेख हसीना यांनी देश सोडला. शेख हसीना यांचे विमान काही तासांपूर्वीच गाझियाबादमधील हिंडन एअरबेसवर उतरले आहे. अजित डोवाल आणि शेख हसीना यांच्यात जवळपास अर्धातास चर्चा झाली. वेस्टर्न एअर कमांडचे एअर मार्शल पंकज मोहन सिन्हा हे देखील या ठिकाणी पोहोचले आहेत.वृत्तानुसार शेख हसीना या भारतमार्गे लंडनला रवाना होण्याची शक्यता सूत्रांच्या माहितीनुसार काही वृत्तसंस्थांनी दिली आहे.
हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिल्यानंतर बांगलादेशचे लष्कर प्रमुख वकार-उज-जमान यांनी पत्रकार परिषद घेतली.जमान यांनी सांगितलं की, ‘तुमच्या मागण्या आम्ही पूर्ण करु. आम्ही देशात शांतता परत आणू. आम्ही या देशात अंतरिम सरकार चालवू. तोडफोड आणि जाळपाळोपासून दूर रहा. तुम्ही आम्हाला सहकार्य केलं तर परिस्थिती सुधारेल. हिंसाचार आणि मारहाणीतून काहीही साध्य होणार नाही. अराजकतेपासून दूर राहा.’
बांगलादेशमध्ये शेख हसीना यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या विरोधात झालेल्या आंदोलन आणि हिंसाचारामध्ये तब्बल १०० पेक्षा जास्त लोकांचा बळी गेला आहे. बांगलादेशमधील या आंदोलनाला हिंसक वळण लागलं असून शेख हसीना यांचं कार्यालयही जाळलं असल्याची माहिती समोर आली आहे. शेख हसीना यांनी देश सोडल्यानंतर बांगलादेच्या लष्करांनी प्रशासनावर तात्पुरता ताबा घेतला आहे. आरक्षणाच्या विरोधात सुरु असलेल्या आंदोलनाचं रूपांतर हिंसाचारात झालं. यानंतर सध्या बांगलादेशमध्ये अनिश्चित काळासाठी संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. बांगलादेशमधील इंटरनेटची सेवाही अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आली आहे.
दरम्यान, शेख हसीना यांनी देश सोडल्यानंतर आंदोलकांनी त्यांच्या निवासस्थांनी घुसून धुडगूस घातला आहे. यासंदर्भातील काही व्हिडीओही व्हायरल झाले आहेत. तसेच निवासस्थांनातील वस्तूंची तोडफोड करत शेख हसीना यांच्या घरातील स्वंयपाक घरात शिरत तेथील बिर्याणीवरही आंदोलकांनी ताव मारला. तर काही आंदोलक शेख हसीना यांच्या बेडवर जाऊन उड्या मारताना दिसले. आंदोलकांनी घरातील प्राण्यांनाही सोडले नाही. ससे, मासे, राजहंस असे प्राणीही आंदोलकांनी पळविले. त्याचे फोटो आणि व्हिडीओ आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. ढाका शहरात रस्त्यांवर अद्यापही आंदोलकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असून शेख हसीना या पदावरून पायउतार झाल्याचा आनंद आंदोलक व्यक्त करताना दिसत आहेत.
बांगलादेशमध्ये घडलेल्या घडामोडींचे पडसाद भारतातही दिसले आहेत. केंद्र सरकारने भारत बांगलादेश सीमेवर अनेक सैन्य तुकड्या पाठवल्या आहेत. बांगलादेशमधील कायदा आणि सूव्यवस्थेची स्थिती पाहता सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) भारत-बांगलादेश सीमेवर हाय अलर्ट जारी केला आहे. तसेच बीएसएफचे महासंचालक कोलकात्यात दाखल झाले आहेत. बांगलादेशमधील कायदा आणि सूव्यवस्था सध्या तिथल्या लष्कराच्या हातात आहे. भारत आणि बांगलादेशची सीमा ४,०९६ किलोमीटर पर्यंत पसरली आहे. या संपूर्ण सीमेवरील बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. बीएसएफने बांगलादेश सीमेवरील सर्व चौक्या व सैन्यतळांना अलर्ट जारी केला आहे.
आंदोलनाची पार्श्वभूमी
बांगलादेशमध्ये सरकारी नोकऱ्यांमध्ये १९७१ च्या युद्धातील वीरांच्या नातेवाईकांना ३० टक्के आरक्षित जागा ठेवण्याचा निर्णय सरकारनं घेतला. त्याला सामान्य तरुण वर्गातून मोठा विरोध निर्माण झाला. तरुणांनी रस्त्यावर उतरून निदर्शनं केली. महिन्याभरापूर्वी झालेल्या या निदर्शनांमध्ये काही तरुणांचा मृत्यूही झाला. प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेलं. सर्वोच्च न्यायालयानं आरक्षण ५ टक्क्यांपर्यंत कमी करून त्यातील फक्त ३ टक्के वीरांच्या नातेवाईकांना आरक्षित ठेवण्याचा निकाल दिला. पण यादरम्यान पोलीस, सरकारी सुरक्षा दलांकडून करण्यात आलेल्या अत्याचाराचा निषेध म्हणून निषेध मोर्चे काढण्यात आले. यातून पुन्हा हिंसाचार होऊन १००हून अधिक जण मृत्यूमुखी पडले.
SL/ ML/ SL
5 August 2024