नेपाळने घातली या भारतीय मसाल्यांंवर बंदी

 नेपाळने घातली या भारतीय मसाल्यांंवर बंदी

काठमांडू, दि. १७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मसाल्यांचा देश अशी जगभर ख्याती असलेल्या भारतातील मसाल्यांबद्दल सध्या जगभर संशयाचे धुके निर्माण झाले आहे. काही दिवसांपूर्वीच एव्हरेस्ट कंपनीच्या मसाल्यामध्ये आरोग्याला अहितकारक पदार्थ आढळल्यामुळे ही बाब प्रकर्षाने समोर आली. सिंगापूर आणि हाँगकाँगनंतर आता नेपाळनेदेखील एमडीएच आणि एव्हरेस्ट ब्रँडचे मसाले आयात करण्यावर बंदी घातली आहे. त्याचबरोबर हे मसाले बाजारात विकण्यावरही बंदी घातली आहे. या मसाल्यांमध्ये घातक रसायने असल्याचे उघड झाल्यानंतर नेपाळच्या अन्न तंत्रज्ञान आणि गुणवत्ता नियंत्रण विभागाने हा मोठा निर्णय घेतला. त्यामुळे या दोन भारतीय मसाल्यांच्या विक्री, वापर आणि आयातीवर बंदी घालण्यात आली आहे.

नेपाळ राज्याचे अन्न तंत्रज्ञान विभागाचे प्रवक्ते मोहन कृष्ण महाराजन यांनी याबाबत माहिती दिली. “या दोन्ही ब्रँडच्या मसाल्यांमधील रसायनांची तपासणी सुरू आहे. या तपासणीचा अहवाल येईपर्यंत मसाल्यांवर बंदी कायम राहणार आहे,” असे त्यांनी म्हटले. न्यूझीलंडचे अन्न सुरक्षा नियामक विभागाचे कार्यवाहक उपमहासंचालक जेनी बिशप यांनी सांगितले की, “या मसाल्यांमध्ये कीटकनाशक इथिलीन ऑक्साईड नावाचे रसायन आहे. त्यामुळे कर्करोग होण्याची शक्यता आहे. हे मसाले न्यूझीलंडच्या बाजारात देखील विकले जात असल्याने याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.”

ब्रिटननेदेखील या मसाल्यांवर कडक नजर ठेवण्याची घोषणा केल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, हाँगकाँगनंतर सिंगापूरच्या फूड एजन्सीने एव्हरेस्टच्या मच्छी करी मसाल्यावर बंदी घातली होती. त्यांनी या मसालाची ऑर्डर परत पाठवली होती. या मसाल्यात इथिलीन ऑक्साईडचे प्रमाण निर्धारित प्रमाणापेक्षा जास्त असल्याचा दावा करण्यात आला होता. याबाबत एजन्सीने म्हटले होते की, “कमी प्रमाणात इथिलीन ऑक्साईडपासून कोणताही धोका नाही. परंतु, ते दीर्घकाळ खाल्ल्यामुळे कर्करोगाचा धोका वाढू शकतो.”

SL/ML/SL

17 May 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *