i phone 12 च्या विक्रीवर या देशात बंदी
पॅरीस,दि. १५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मर्यादेपेक्षा जास्त किरणोत्सर्गामुळे फ्रान्समध्ये आयफोन 12 च्या विक्रीवर सरकारने बंदी घातली आहे. ॲपलने सॉफ्टवेअर अपडेट आणण्याचे आश्वासन दिले आहे. यामुळे अतिरिक्त किरणोत्सर्गाची समस्या दूर होईल, असा त्यांचा दावा आहे. फ्रान्सने या निर्णयाचे स्वागत केले आहे. दुसरीकडे, ॲपललाही आशा आहे की, सॉफ्टवेअर अपडेटनंतर फ्रान्स ही बंदी उठवेल.
फ्रान्सच्या या निर्णयावर ॲपलने म्हटले आहे की, ‘आम्ही वापरकर्त्यांना फ्रेंच नियामकांच्या प्रोटोकॉलचे पालन करण्यासाठी सॉफ्टवेअर अपडेट जारी करू.’ ॲपलने स्पष्ट केले आहे की सुरक्षिततेबद्दल काळजी करण्याची गरज नाही, ही समस्या केवळ फ्रेंच नियामकांच्या विशिष्ट चाचणी प्रोटोकॉलशी संबंधित आहे.
फ्रान्सने दावा केला आहे की iPhone-12 मॉडेल युरोपियन युनियन (EU) मानकांपेक्षा जास्त इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन उत्सर्जित करते.
फ्रान्सच्या डिजिटल मंत्रालयाने म्हटले आहे की, ‘देशातील रेडिएशन वॉचडॉग सॉफ्टवेअर अपडेटची चाचणी EU मानकांच्या कक्षेत आहे की नाही हे शोधण्यासाठी वेगाने चाचणी करण्याची तयारी करत आहे. जर ते जास्त असेल तर iPhone-12 च्या विक्रीवर बंदी कायम राहील.
ॲपलने 2020 मध्ये iPhone-12 मॉडेल लाँच केले. हे कंपनीचे जुने मॉडेल आहे. अलीकडे, ॲपलने iPhone-15 मालिका मॉडेल लॉन्च केले आहेत, तर iPhone-12 आता टप्प्याटप्प्याने बंद होण्याच्या प्रक्रियेत आहे.
SL/KA/SL
15 Sept. 2023