मंत्रालयाच्या आवारात फोटोसेशन, रिल्स बनवण्यास बंदी

मुंबई, दि. ८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सोबत पुण्यातील अट्टल गुन्हेगारांचे फोटो व्हायरल झाले होते. यामुळे विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवली होती. खासदार संजय राऊत यांनी या भेटीचे फोटो देखील ट्विट केले होते. त्यांनी सरकारवर गुंडाराज म्हणून टीकेची झोड उठवली होती. त्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील याबाबत जाब विचारला होता. त्यामुळं मंत्रालय प्रशासन आणि पोलिसांनी मंत्रालयात रिल्स तयार करण्यावर बंदी घातली आहे. याशिवाय, मंत्रालयाच्या इमारतीत फोटो काढणाऱ्यांवर देखील नजर ठेवली जाणार आहे.मंत्रालयात आल्यावर मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री तसेच इतर मंत्र्यांच्या दालनासमोर फोटो आणि सेल्फी काढण्याकडे अनेकांचा कल असतो. पोलीस आता त्यांच्यावर देखील नजर ठेवणार आहे.
पुण्यातील अट्टल गुंड आणि नुकताच जामिनावर सुटलेला नीलेश घायवळ यानं मंत्रालय भेटीची एक रील बनवली होती. ही रील सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळं एकच खळबळ उडाली. विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवली होती. त्यात गुंड नीलेश घायवळचा मंत्रालयातील रील व्हायरल झाल्याने मंत्रालयातील सुरक्षेवर आणि थेट मंत्रालयातून गुन्हेगारीचे उदात्तीकरण होत असल्याचा आरोप होत होता. विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी गुंड नीलेश घायवळचे रिल्स माध्यमांसमोर आणले. राज्यातील शिंदे-फडणवीस यांचे महायुतीचे सरकार गुंडांना अभय देत असून सरकारच्या मेहेरबानीने गुंड मंत्रालयात बिनधास्त फिरतात. मंत्रालयात रिल्स तयार करतात. गुंडांना राजाश्रय मिळत असल्याची टीका त्यांनी केली होती. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अडचणीत आल्याने पोलिसांनी आणि मंत्रालय प्रशासाने आत मंत्रालयाच्या आवारात रील्स बनवण्यास बंदी घातली आहे.
SL/KA/SL
8 Feb. 2024