बाळकुम, कोलशेत खाडीकिनाऱ्याच्या खारफुटीवरील अतिक्रमणाची होणार चौकशी

 बाळकुम, कोलशेत खाडीकिनाऱ्याच्या खारफुटीवरील अतिक्रमणाची होणार चौकशी

मुंबई, दि. ६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ठाणे आणि परिसराला खाडीच्या सान्निध्यामुळे खारफुटीच्या वैशिष्ट्यपूर्ण अशा जैवविविधतेचा ठेवा लाभला आहे. मात्र शहराच्या अक्राळविक्राळ विस्तारामुळे आणि शहरनियोजन तसेच पर्यावरणीय धोरणांच्या योग्य अंमलबजावणीच्या अभावी खारफुटीच्या जमिनींवर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण होत आहे. येथील बाळकुम, कोलशेत भागातील खाडीकिनारी परिसरातील खारफुटीवर मोठ्या प्रमाणात राडारोड्याचा भराव टाकून त्या जागेवर अतिक्रमण करण्यात आले आहे. हा मुद्दा भाजपचे आमदार संजय केळकर यांनी विधानसभा अधिवेशनात उपस्थित करताच त्याची गंभीर दखल घेऊन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी खाडी भरावप्रकरणी चौकशी समिती नेमून कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.

कोलशेत आणि बाळकुम भागात खाडीतील खारफुटीची वने भराव टाकल्यामुळे उद्ध्वस्त झाली आहेत. नागरीकरणामुळे येथे पूर्वी येणारे फ्लेमिंगोसारखे विदेशी पक्षी देखील येईनासे झाले आहेत तर निसर्गाचाही ऱ्हास झाला असल्याचे केळकर यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणले. याबाबत वन, महसूल आणि महापालिका एकमेकांकडे बोट दाखवून कारवाई टाळत आहेत. त्यामुळे भूमाफिया आणि तथाकथित विकासकांचे फावले असून काँक्रीटची जंगले वाढत आहेत. या तीन पैकी एकाच विभागाकडे जबाबदारी निश्चित करण्यात यावी अथवा तिन्ही विभागांनी एकत्रित कारवाई करावी, अशी मागणी केळकर यांनी केली.

यावर उत्तर देताना वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काही ठिकाणी अधिकाऱ्यांना हाताशी धरून कांदळवनाचा ऱ्हास होत असल्याची कबुली दिली. या प्रकरणी आर्थिक दंड आकारण्याऐवजी शिक्षा भोगण्याची तरतूद करण्याची गरज व्यक्त केली. ठाण्यात कांदळवन उद्ध्वस्त करून त्यावर बांधकामे होत असतील तर आमदार संजय केळकर यांच्या अध्यक्षतेखाली या प्रकरणी चौकशी समिती नेमून संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

SL/ML/SL

6 July 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *