बुलढाण्यात टक्कल व्हायरसचा कहर, केसगळतीमुळे अनेक लोक त्रस्त

HMPV चे सावट असतानाच आता बुलढाण्यात एका अज्ञात व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. या व्हायरसमुळे अवघ्या तीन दिवसांतच टक्कल पडत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. काही गावांत ही गंभीर समस्या जाणवत आहे. तीन दिवसातच काही जणांचे केस गळून टक्कल पडत असल्याने नागरिक हैराण आहेत.शेगाव तालुक्यातील बोडगाव, कालवड, हिंगणा या गावात अज्ञात कारणामुळे केस गळतीच्या आजाराने थैमान घातले आहे. अनेक कुटुंबातील सदस्य याचा बळी ठरत आहेत. अगोदर डोक्याला खाज येणे, नंतर सरळ केस हाती येणे आणि तिसऱ्या दिवशी चक्क टक्कल पडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यामध्ये महिलांची संख्याही लक्षणीय आहे. या प्रकाराकडे राज्य सरकारचे दुर्लक्ष असल्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे.