तैलचित्र अनावरणाला आशा भोसले नक्की, ठाकरेंचे अनश्चित…
मुंबई, दि.२१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुंबईतील विधिमंडळ मुख्य सभागृहात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राच्या अनावरणाला प्रसिध्द गायिका आशा ताई भोसले येण्याचे नक्की झाले असले तरी उद्धव ठाकरे येणार का हे मात्र अद्याप अनिश्चित आहे.
येत्या तेवीस तारखेला बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त या तैलचित्राचे अनावरण होत असून त्यानिमित्ताने अनेक मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले आहे, त्यापैकी आशा भोसले यांनी येण्यास संमती कळविली आहे तर अमिताभ बच्चन यांनी मात्र असमर्थता दर्शविली आहे. दिलीप वेंगसरकर , माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी , जयदेव ठाकरे , राज ठाकरे , निहार ठाकरे , स्मिता ठाकरे , अभिनेता सचिन , नवाझुद्दीन सिद्दीकी, विधिज्ञ आशुतोष कुंभकोणी आदींनी उपस्थित राहण्यास संमती कळवली आहे .
उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्य यांना आपण स्वतः फोनवरून निमंत्रण दिले आहे असे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सांगितले आहे, मात्र ते येतील का याबाबत अद्याप स्पष्टता नाही . या कार्यक्रमासाठी केवळ दूरदर्शन चा कॅमेरा सभागृहात असणार असून खासगी वाहिन्यांना त्यातूनच प्रक्षेपण मिळणार आहे, याशिवाय आकाशवाणी आणि पिटीआय यांनाच सभागृहात प्रवेश दिला जाईल , बाकीच्यांना गॅलरीत प्रवेश मिळेल .
या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर दहा खुर्च्या लावण्यात येणार असून त्यातील एक उद्धव ठाकरे यांच्यासाठी राखीव आहे मात्र ती कोणत्या क्रमांकावर आहे ते स्पष्ट झालेले नाही, सद्य राजकीय स्थितीत ते येतात का हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल .
ML/KA/SL
21 Jan. 2023