१३५ वर्षाची परंपरा असणारा विदर्भातील पुरातन बारभाई गणपती

अकोला दि ३०:– लोकमान्य टिळकांनी १८९४ मध्ये विंचूरकर वाड्यात गणेशोत्सवाची सुरवात केली तर भाऊसाहेब रंगारी यांनी १८९३ मध्ये सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली. लोकमान्य टिळकांमुळे गणेशोत्सवाला राष्ट्रीय स्वरुप प्राप्त झाले.मात्र त्याहीपूर्वी १८९० मध्ये अकोल्यातील १२ विविध जातीं धर्माच्या लोकांनी एकत्र येत बाराभाई गणपतीची स्थापना केली होती.त्यामुळे विदर्भातील सर्वात पुरातन व पेशवेकालीन ऐतिहासिक महत्त्व असणाऱ्या बाराभाई गणेशोत्सवाकडे स्वातंत्र्यपूर्व काळापासून सर्व धर्म समभावाचे प्रतीक म्हणून पाहले जाते..
अकोल्यातील श्री बाराभाई गणपती अकोल्यातच नव्हे तर संपूर्ण देशात प्रसिद्द आहे. विविध जाती धर्माच्या एकतेचे प्रतीकही आहे.श्री बारभाई गणपतीला गणेश उत्सवात मानाचा गणपती म्हणून विशेष मान आहे.गणेश उत्सवामध्ये स्वतंत्रपूर्व काळापासून हा गणपती प्रथम क्रमांकावर असतो. या गणपतीला वैशिष्टयपूर्ण स्थान प्राप्त झाले आहे, ते त्याच्या आगळ्या वेगळ्या इतिहासामुळे.
स्वातंत्र्य पूर्वकाळात छोट्याशा अकोला शहरात पाच सहा गणेश मंडळाची स्थापना झाली होती. त्यात प्रथम मान बाराभाई गणपतीला मिळाला होता. त्याकाळी कै. भगवाननाथजी इंगळेसह विविध बाराजातीच्या लोकांनी एकत्र या गणपतीची स्थापना केली होती. तेव्हाच या गणपतीला बाराभाई गणपती हे नाव मिळाले. त्या काळच्या बाराजातींच्या लोकांनी स्थापन केलेल्या गणपतीचा वारसा आजही इंगळे यांच्या परिवाराने कायम ठेवला आहे.या गणपतीसाठी कोणत्याच प्रकारची वर्गणी गोळा केली जात नाही. यासाठी येणारा पूर्ण खर्च इंगळे परिवार करतो
बाराभाई गणपतीची मूर्ती काळ्या मातीपासून बनवलेली असून ही मूर्ती ठाकूर समाजातील मोरे नामक कारागिराने बनवली होती. या मूर्तीचे विसर्जन केल्या जात नाही,मिरवणुकीमधील मानाच्या आरती नंतर परत ही मूर्ती त्याच जागी ठेवली जाते.हे पर्यावरण पूरक गणपतीचे वैशिष्ट्य आहे.
मिरवणुकीमध्ये पालखी उचलण्याचा मान भोई समाजातील बांधवाना असतो. आजूबाजूच्या खेड्यामधून जी भजनी मंडळ, दिंड्या येतात ते ही विविध समाजातील लोकांच्या असतात, आणि ते याचा मोबदला म्हणून मूर्तीच्या गळ्यातील हार आणि शेला नारळाशिवाय काहीच स्विकारत नाहीत.
मनोकामना पूर्ण करणारा गणपती म्हणून बाराभाई गणपतीची महती असून गणपतीच्या दर्शनाला हजारो भाविक येत असतात. त्यामुळेच भक्तांची असीम श्रद्धा बाराभाई गणपतीवर आहे. १३५ वर्षापूर्वी विविध जातीच्या लोकांना एकत्र करीत स्वातंत्र्य चळवळीसह राष्ट्रीय एकात्मता व सर्वधर्म समभावाचा संदेश देणारा बाराभाई गणपती एकता आणि अखंडतेचे प्रतिक म्हणावे लागेल हे निश्चित….ML/ML/MS