बी बियाणे आणि खते चढ्या भावाने विक्री, भरारी पथके तैनात

मुंबई दि. १५- – राज्यात कोणत्याही बी- बियाणांची चढ्या भावाने विक्री, बोगस बियाण्यांची विक्री, लिंकिंग यासारख्या अपराध करणाऱ्या कृषी निविष्ठा दुकानदारांना आता चाप बसणार असून कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी या विषयात आक्रमक भूमिका घेतली आहे.

राज्यात आवश्यक असलेले बी – बियाणे मुबलक प्रमाणात उपलब्ध असून खतांची अतिरिक्त मागणी देखील येत्या आठवड्याभरात पूर्ण होईल. मात्र आता बी – बियाणे तसेच खते कीटकनाशके आदींची वितरण प्रणाली मात्र अधिक कडक होणार असून कृषी विभागासह आता पोलीस खात्याचीही यावर करडी नजर असणार आहे.

कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी आज याबाबत राज्यस्तरावर बैठक आयोजित करून प्रत्येक जिल्ह्यात त्या जिल्ह्यातील खरीप पिके, त्यांच्या बी बियाणे – आवश्यक खतांची उपलब्धता, आतापर्यंत झालेला पाऊस, आतापर्यंत झालेली पेरणी, त्याचबरोबर बी – बियाणांची आतापर्यंत झालेली विक्री, संबंधित जिल्ह्यातील पीक कर्ज वाटपाची आकडेवारी तसेच मागील काळात वितरित करण्यात आलेला किंवा प्रलंबित असलेला पीक विमा या सर्व विषयांचा सुमारे 4 तास समग्र आढावा घेतला. या बैठकीसाठी सर्व विभागीय आयुक्त, सर्व जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, महाबीजचे अधिकारी, कृषी संचालक, कृषी आयुक्त यांच्यासह अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

बी बियाणे चढ्या भावाने विक्री , इतर चुकीच्या गोष्टी रोखण्यासाठी एक ऐवजी आता प्रत्येक जिल्ह्यात अतिरिक्त तीन भरारी पथके नेमावेत तसेच या भरारी पथकांनी दररोज कमीत कमी 25 दुकानांवर धडक भेटी देऊन तपासण्या कराव्यात, कोणताही गैरप्रकार आढळल्यास जागच्या जागीच गुन्हा दाखल करून परवाना निलंबनाची कारवाई करावी, राज्य शासनाने जारी केल्याप्रमाणे प्रत्येक जिल्ह्याने आपला स्वतःचा एक इमर्जन्सी हेल्पलाईन , व्हाट्सप नंबर स्थानिक स्तरावर जाहीर करावा, जिल्हाधिकारी , जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी त्यावरील तक्रारीची स्वतः दखल घ्यावी तसेच एक तासात शहानिशा करून त्या तक्रारींचे निरसन करावे, असे निर्देश धनंजय मुंडे यांनी यावेळी दिले आहेत.

तालुकास्तरावर प्रत्येक तालुक्यात कमीत कमी दहा तरी डमी गिऱ्हाईके दररोज विविध दुकानांवर पाठवून दर तसेच अन्य बाबींची पडताळणी करावी आणि कुठेही कोणताही गैरप्रकार आढळल्यास तात्काळ जागच्या जागी कारवाई करावी. कुणाच्याही दबावाला बळी पडू नये किंवा कोणतेही अडचण आल्यास थेट माझ्याशी संपर्क करावा, असेही मुंडे बैठकीत बोलताना म्हणाले.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *