आयुष्का गादेकरला आशियाई ज्युनियर कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक
वाशीम, दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यातील जयपूर या गावातील रहिवासी आणि कोकलगाव येथील स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षण घेत असलेली आयुष्का पांडुरंग गादेकर हिने थायलंडमधील श्रीराचा येथे १५ वर्षांखालील आशियाई कुस्ती स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावले. आयुष्काने अंतिम सामन्यात उझ्बेकिस्तानच्या दिलनुरा अवेझोवाचा पराभव केला. तिच्या या यशामुळे वाशीम जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवल्या गेला आहे.
पांडुरंग गादेकर हे जयपूर येथील अल्पभूधारक शेतकरी आहेत. त्यांना एक मुलगा अर्जुन तसेच कल्याणी आणि आयुष्का या दोन मुली आहेत. पांडुरंग गादेकर हे स्वतः राष्ट्रीय कुस्तीपटू राहिले आहेत, तर त्यांच्या पत्नी कांचन गादेकरसुद्धा कबड्डीपटू होत्या. त्यामुळे त्यांच्या तिन्ही अपत्यांना घरातूनच कुस्तीचे बाळकडू मिळाले. त्या तिघांनीही विविध कुस्ती स्पर्धात चमकदार कामगिरी केली आहे. त्यात मुलगा अर्जुनने खेलो इंडिया कुस्ती स्पर्धेत राष्ट्रीयस्तरावर सुवर्णपदक पटकावले, तर मोठी मुलगी कल्याणीनेही राष्ट्रीयस्तरावर सुवर्णपदके पटकावली आहेत.
आयुष्कानेही राज्य आणि राष्ट्रीयस्तरावर कुस्ती स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी केली आहे.
आता तिने थायलंडमधील श्रीराचा येथे पार पडलेल्या १५ वर्षांखालील आशियाई कुस्तीस्पर्धेच्या ५८ किलो गटात उझ्बेकिस्तानच्या प्रतिस्पर्धी खेळाडूला पराभूत करीत सुवर्णपदकाला गवसणी घातली.
ML/ ML/ SL
19 July 2024