जागतिक अन्नधान्य नासाडी रोखण्यासाठी जनजागृती दिन : अन्नधान्य वाया जाणे म्हणजे त्याच्या उत्पादनामागच्या श्रम आणि वेळेचाही अपव्यय

 जागतिक अन्नधान्य नासाडी रोखण्यासाठी जनजागृती दिन : अन्नधान्य वाया जाणे म्हणजे त्याच्या उत्पादनामागच्या श्रम आणि वेळेचाही अपव्यय

राधिका आघोर

29 सप्टेंबर हा दिवस जागतिक अन्नधान्य नासाडी आणि नुकसान रोखण्यासाठीचा जनजागृती दिवस म्हणून पाळला जातो. संयुक्त राष्ट्रांच्या अन्न आणि कृषी संस्थेने तसेच संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम यांनी 2019 साली हा दिवस घोषित केला होता. त्याच्या नावातच स्पष्ट असल्याप्रमाणे, ह्या दिवसाचा उद्देश, अन्नधान्याची, खाद्य पदार्थांची नासाडी आणि नुकसान टाळावे यासाठी जनजागृती करणे हा आहे.

अन्नधान्याची नासाडी ही जागतिक स्तरावरची अत्यंत गंभीर समस्या असून दरवर्षी जगभरात जेवढे धान्य उत्पादित केलं जातं, त्याच्या एक तृतीयांश अन्न वाया जातं. ज्यातून अन्नाचा तुटवडाही उद्भवतो. त्याशिवाय, अन्नधान्य उत्पादन म्हणजेच शेती अत्यंत श्रम आणि वेळखाऊ प्रक्रिया आहे. एक धान्य पूर्ण तयार होण्यासाठी आपल्याला संपूर्ण हंगाम खर्ची घालावा लागतो, त्याशिवाय शेतकऱ्यांचे परिश्रम, अन्नधान्य पिकवण्यासाठी लागणारी पाणी, भांडवल, वीज, बी बियाणे, खते, कीटकनाशके आणि मनुष्यबळ हे सगळं अन्नधान्य नासाडीमुळे वाया जात असतं, हे समजून घेतलं तर अन्नधान्य वाया जाण्याचे गांभीर्य आपण समजून घेऊ शकतो.

अन्नधान्य ही नाशवंत वस्तू आहे. अन्न खराब झाले, नासले तर आपण ते फेकून देतो, अगदी छोट्या प्रमाणावर ही कृती केली, तर त्याचा परिणाम आपल्या लक्षात येत नाही. मात्र, खूप मोठ्या प्रमाणावर जेव्हा अन्नधान्य नासाडी होते, त्यावेळी त्यातून निघणारा मिथेन वायू अत्यंत प्रदूषणकारी असतो. हवामान बदलासाठी असे प्रदूषण मोठ्या प्रमाणात जबाबदार असते. अन्नधान्याची नासाडी अशा अनेक गोष्टींवर दीर्घकालीन परिणाम करत असते.

आता जरा आकडेवारीकडे नजर टाकूया. जगभरात अन्नधान्याच्या होणाऱ्या नासाडीत 60 टक्के अन्न घराघरातून वाया जात असतं. तर मोठमोठ्या हॉटेल्स किंवा इतर खाद्यपदार्थ व्यवसायात 28 टक्के अन्न वाया जात असतं. किरकोळ हॉटेल व्यवसायात 12 टक्के अन्न वाया जातं. एकीकडे जगात आजही उपासमारीची समस्या असताना, अन्नधान्याचा तुटवडा असताना, अशी अन्नधान्याची नासाडी आपल्यासाठी खूप नुकसानकारक आहे. ऑस्ट्रेलिया आणि युरोपीय देशात अन्न वाया घालवण्याची प्रवृत्ती अधिक आहे. त्या तुलनेत भारतात, लोकसंख्या अधिक असूनही अन्न पुन्हा वापरण्याची प्रवृत्ती आणि सवय असल्याने अन्न कमी वाया जातं. मात्र, धान्य संग्रह करण्याची पुरेशी व्यवस्था नसणे, अपुरी गोदामे, अन्न प्रक्रिया युनिट्स ची तुलनेने कमी संख्या, वाहतूक व्यवस्था कमी असणे, या सगळयामुळे कृषी मालाचे नुकसान होणे अशाप्रकारचे नुकसान होते. दोन्ही प्रकारचे नुकसान हानिकारकच आहे.

आपण 2030 पर्यंत शाश्वत विकासाची उद्दिष्टे साध्य करण्याचे निश्चित केले आहे. त्याला आता जेमतेम सहा वर्षे उरली आहेत. त्यातीलच एक उद्दिष्ट अन्नधान्याचा जबाबदारीने वापर आणि उत्पादन असे आहे. हे साध्य करायचे असेल, तर जलद हालचाली आणि उपाययोजना कराव्या लागतील. अन्नधान्याचे नुकसान टाळण्यासाठी आपल्याला मोठ्या स्तरावर तर अधिक चांगली स्टोरेज व्यवस्था करावी लागेल. नाशवंत मालाची वाहतूक करण्यासाठी जलद मालवाहतूक व्यवस्था निर्माण करावी लागेल. त्याशिवाय अन्नप्रक्रिया उद्योगांची संख्या ही मोठ्या प्रमाणावर वाढवावी लागेल.

ह्या मोठ्या स्तरावरच्या उपाययोजना झाल्या. मात्र आपल्याला आपल्या घरात, परिसरात किंवा बाहेर जेवायला गेलो तरीही अन्न वाया जाणार नाही, यासाठी काय करता येईल, याचा विचार व्हायला हवा. त्यासाठी आपल्या जेवणाचे नीट नियोजन करणे, आवश्यक तेवढेच अन्न शिजवणे,अन्न उरले तर त्यावर प्रक्रिया करुन किंवा फ्रीजमध्ये ठेवून त्याचा पुन्हा वापर करणे. अन्न उरले असल्यास, पुन्हा नव्याने अन्न न शिजवणे असे उपाय वैयक्तिक स्तरावर करू शकतो. तसेच मोठे कार्यक्रम, लग्न समारंभ वगैरे मधे अन्नाची मोठी नासाडी होते. हे टाळण्यासाठी आपण आवश्यक तेवढेच अन्न आपल्या पानात वाढून घेणे, प्लेट मधे घेतलेले सगळे पदार्थ संपवणे आवश्यक असते.

हॉटेल मधेही खाद्यपदार्थ मागवताना निवडक तेवढेच मागवावेत, जेणेकरुन अन्न वाया जाणार नाही.
आपल्याकडे अन्नाला ‘ पूर्णब्रह्म ‘ असे म्हणतात. आपले अस्तित्व, आपले भरण पोषण अशा अन्नावर अवलंबून असते. त्यामूळे अन्न वाया घालवणे हे पाप आहे, असाच विचार लहानपणापासून रुजवायला हवा. आपल्या पानात वाढल्या जाणाऱ्या प्रत्येक पदार्थामध्ये किती जणांची मेहनत आहे, याची जाणीव आपल्याला असायला हवी. तरच वैयक्तिक स्तरावर आपण कृषी, शेतकरी, अन्नधान्य अशा सर्व गोष्टींचा सन्मान करु शकतो. अशा सजग आणि संवेदनशील नागरिकांची आज गरज आहे.
अन्नधान्याची नासाडी आणि नुकसान ही जागतिक शोकांतिका असून तिचे दीर्घकालीन परिणाम मानवजातीला भोगावे लागतात. हे समजून, आपण अन्नधान्याचा सन्मान आणि मोल जपायला हवे.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *